नवी मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात नवी मुंबईतील २३ विसर्जन स्थळांवर दीड दिवसांच्या गणपतीला उत्साहात निरोप देण्यात आला. दुपारनंतर शहरातील विसर्जन स्थळांचा परिसर गजबजून गेला होता. रात्री उशिरापर्यंत शांततेत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या वतीने सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्तात विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २३ विसर्जन स्थळांवर ८३७७ घरगुती आणि ३४ सार्वजनिक अशा दीड दिवसांच्या ८४११ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळांवर करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात ५ विसर्जन स्थळांवर २०१८ घरगुती आणि २४ सार्वजनिक, नेरुळ विभागात २ विसर्जन स्थळांवर १४५८ घरगुती आणि २ सार्वजनिक, वाशी विभागात १४६९ घरगुती आणि ३ सार्वजनिक, तुर्भे विभागात २ विसर्जन स्थळांवर २३८ घरगुती आणि ३ सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात ३ विसर्जन स्थळांवर ११८६ घरगुती, घणसोली विभागात ४ विसर्जन स्थळांवर ७६३ घरगुती आणि २ सार्वजनिक, ऐरोली विभागात ३ विसर्जन स्थळांवर १००९ घरगुती तसेच दिघा विभागात १ विसर्जन स्थळावर २३४ घरगुती अशा एकूण ८४११ श्रीगणेशमुर्तींना भावपूण निरोेप देत विसर्जन करण्यात आले.
नवी मुंबईतील मुख्य १४ तलावांमध्ये इटालियन गॅबियन वॉल पध्दतीची रचना करण्यात आली असून गणेश भक्तांनी त्याच विशिष्ट क्षेत्रात श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून पर्यावरण संरक्षण-संवर्धन कार्यात उत्स्फुर्त सहभाग दर्शवला. सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबुंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त विभाग अधिकारी यांच्या
नियंत्रणाखाली विसर्जनस्थळी लाईफगार्डस्, स्वयंसेवक यांच्यासह अग्निशमन दलही कार्यरत होते. तराफ्यांसह आवश्यक त्याठिकाणी फोर्कलिफ्टची व्यवस्था तसेच प्रत्येक विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह महापालिकेच्या वतीने प्रथमोपचाराची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती.
दरम्यान, गणशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा सर्वच ठिकाणी अत्यंत सतर्कतेने कार्यरत असून सर्व बाबींवर करडी नजर ठेवली जात आहे. विसर्जन स्थळांवर महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून व्यासपीठ उभारण्यात आले असून त्याठिकाणी स्वागत आणि सूचनांसाठी ध्वनीक्षेपक व्यवस्था करण्यात आलेली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शहर आंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली परिमंडळ-१चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि परिमंडळ- २चे उप आयुक्त अमरीश पटनिगिरे तसेच सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त-विभाग अधिकारी त्यांच्या अधिकारी कर्मचार्यांसह संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांच्या सहयोगाने यापुढील काळातील श्रीगणेविसर्जन या पध्दतीनेच सुव्यव्सथित रितीने होण्यासाठी सज्ज असणार आहेत.