नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रस्ते, पदपथ, मार्जिनल स्पेस अतिक्रमणमुक्त ठेवण्यासोबतच अनधिकृतरित्या बांधलेल्या इमारती निष्कासित करून नवी मुंबई शहर अतिक्रमण विरहीत करण्याच्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार से. 48 ए, सिवूड, नेरूळ येथील शिव कॉम्प्लेक्स या चार मजली अनधिकृत इमारतीवर धडक कारवाई करत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही इमारत जमीनदोस्त केली.
सिडको महामंडळाकडून महिला कल्याणाकरीताचे उपक्रम या प्रयोजनाकरीता हस्तांतरीत करण्यात आलेल्या भूखंडावर नवी मुंबई महानगरपालिकेकडून 2007 मध्ये बांधकाम प्रमाणपत्र प्राप्त करून जोते प्रमाणपत्र न घेताच तळमजला अधिक चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते.
यामध्ये महिला कल्याणाकरीताचे उपक्रम राबविले जाणे अपेक्षित असताना याठिकाणी बांधकाम व्यवसायिकाचे कार्यालय, अत्याधुनिक जिम अशा स्वरुपाच्या व्यवसायिक बाबी सुरु होत्या. हे निदर्शनास आल्यानंतर सिडको महामंडळाने या भूखंडावर केलेले वाटप पत्र रद्द करून भूखंड ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात आल्याचे सूचित केले होते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत या इमारतीस तीन महिन्यांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीच्या विरोधात बांधकाम धारकाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र मा. न्यायालयाने सदर याचिक फेटाळल्याने महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री.अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, प्र.उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, विभाग अधिकारी श्री. सुभाष अडागळे, अधिक्षक श्री. दत्ता काळे यांच्या निरीक्षणाखाली महापालिका अधिकारी – कर्मचारी आणि पोलीस यांच्या माध्यमातून ही धडक कारवाई करण्यात आली.