सीएसटी पनवेल प्रवास होणार सुखकर
सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग
* १२ स्टेशन्स प्रस्तावित
* ६/८ डब्यांची एक गाडी अपेक्षित
* १५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प
* २१ हजार प्रवाशांची प्रती तास वाहतूक क्षमता
* १४ फेर्या एका तासात
* ५ मिनिटाला एक गाडी
* ४५-४८ मिनिटे प्रवासाला लागणारा वेळ
* टिळकनगर स्थानकाचा प्रकल्पात समावेश
* ताशी ६० किलोमीटर वेगाने धावणार लोकल
नवी मुंबई ः बहुचर्चित सीएसटी-पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडे नुकताच पाठविण्यात आला असून, सीएसटी-पनवेल फास्ट कॉरीडोर वरुन पहिली लोकल २०२२ मध्ये धावणार आहे. सीएसटीपनवेल
फास्ट कॉरीडोर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. हार्बर मार्गावरील गर्दीवर उतारा ठरु शकणार्या
सीएसटी-पनवेल उन्नत मार्गासाठीच्या निविदा मागविण्याची प्रक्रिया काही दिवसांमध्ये पूर्ण होणार असून, त्यानंतर या प्रकल्पाला खर्या अर्थाने गती मिळणार आहे. सीएसटी-पनवेल उन्नत मार्गासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सदर प्रस्ताव मान्यतेसाठी नीती आयोगाकडे पाठवला जाणार आहे. सीएसटी-पनवेल उन्नत मार्गाच्या पूर्ततेसाठी तांत्रिक आणि आर्थिक पातळीवरील निविदा मागवल्या जाणार आहेत.
सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्पात १२ स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये ८ एलिव्हेटेड (उन्नत) तर ३ समांतर स्थानके आहेत. सीएसटी, वडाळा, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, नेरुळ, बेलापूर रेल्वे स्थानक एलिव्हेटेड तर वाशी, नवी मुंबई विमानतळ, खारघर, पनवेल स्थानके अन्य स्थानकांना समांतर अशी करण्यात येणार आहेत. यामध्ये पूर्वी कॉटन ग्रीन स्थानकाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पाचा पुन्हा नव्याने प्राथमिक अहवाल तयार करताना कॉटन ग्रीन स्थानकाऐवजी टिळक नगर स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. टिळक नगर स्थानक एलिव्हेटेड असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नवी मुंबई एअरपोर्टमार्गे एलिव्हेटेड प्रकल्प जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ स्थानक देखील या मार्गावर असणार आहे.
सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्प पूर्ण झाल्यावर सध्या सीएसटी ते पनवेल या दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा ७५ मिनिटांचा वेळ ४८ मिनिटांचा होणार आहे. ताशी ६० किलोमीटर वेगाने या मार्गावरुन लोकल धावणार आहे. सीएसटी ते पनवेल फास्ट एलिव्हेटेड मार्गावरुन सहा किंवा आठ डब्यांची लोकल चालविण्याचा विचार एमआरव्हीसीकडून करण्यात आला आहे. २०२२ पर्यंत सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याने त्यासाठी एमआरव्हीसीकडून सर्व बाबी पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरीडोर मार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार आहे. त्यामध्ये ‘सिडको’ने केलेल्या सुचनेनुसार सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरीडोर पामबीच मार्गावरुन जाणार आहे. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर चालणार्या या सेवांमध्ये आठ डब्यांची एक गाडी अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावास रेल्वे बोर्डाने संमती दिली आहे. सुमारे १४,५६१ कोटी रुपयांच्या या सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरीडोर प्रकल्पात २०१९ पर्यंत एका तासात सुमारे २१ हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता आहे. तर २०३५ पर्यंत प्रवाशी क्षमता ३५ हजार प्रवाशांवर जाणार आहे. या सेवेच्या एका तासात साधारण १४ फेर्या चालणार असून दर चार ते पाच मिनिटाला एक गाडी चालवण्यात येणार आहे.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांना एकीकडे गती येत असताना दुसरीकडे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि मजबूत करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत नवी मुंबई विमानतळाला जोडून पनवेल-सीएसटी उन्नत मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून त्यासाठी लगबग सुरु आहे.