- अकोला : अत्यावश्यक सेवेसाठी असणाऱ्या आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एका ६ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्हयातील बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना (पुनर्वसन) येथे घडली.
येथील रोहीत सुरेश मोहिते (६) या बालकाला राहत्या घरी झोपलेल्या अवस्थेत १० सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर सर्पदंश झाला. सर्वच जण झोपलेले असल्याने ही बाब कळली नाही. परंतु काही वेळेनंतर रोहितला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व तोंडातून फेस गळत असल्याने त्याला सर्पदंश झाल्याचे आईवडिलांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ३.५७ वाजता १०८ या रुग्णवाहिका सेवेला फोन करून कळविले.
परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मोहिते यांनी पुन्हा ४.३४ वाजता फोन केला. तेव्हा पातूर व बार्शीटाकळी येथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. नातेवाइकांना खासगी वाहनाने बालकास बार्शीटाकळीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी अकोला पाठविण्याचा सल्ला दिला. खाजगी वाहनाने नेऊन बालकाला जिल्हा समान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी रोहीतला मृत घोषित केले.
११ सप्टेंब रोजी रोहितवर जनुना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहितच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, एक भाऊ आहे. १०८ वरील रुग्णवाहिका जर वेळेवर उपलब्ध झाली असती तर रोहितचे प्राण वाचले असते. परंतु रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने रोहितचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला.