सेक्टर ८ मधील अरूणोदय सोसायटीतील पांजारीच्या सदनिकेत घडली दुर्घटना
सिध्देश प्रधान
नवी मुंबई : सिडको इमारतीमधील स्लॅप कोसळण्याच्या घटना नवी मुंबईकरांच्या अंगवळणी पडल्या आहेत. सिडकोची एकीकडे झालेली निकृष्ठ दर्जाची बांधकामे व लिकेजच्या समस्येने इमारतीच्या धोकादायक बनण्याला लागलेला हातभार अशी विविध कारणे आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नेरूळ सेक्टर आठमधील अरूणोदय सोसायटीत शरद पाजांरी यांच्या घरात स्लॅप कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत शलाका पांजारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
नेरूळ सेक्टर ८ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शरद रामचंद्र पांजारी हे गेल्या ३० वर्षापासून अरुणोदय सोसायटीमध्ये राहत आहेत. १९८७ ला त्यांना सदनिकेचा ताबा मिळाला. त्यानंतर ते आपल्या परिवारासह या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. पांजारी हे सहा दिवसांच्या गणपती सुट्टीत गावी गेले असता ते सोमवारी सकाळी ६ वाजता घरी परत आले. सकाळी ११ च्या सुमारास अचानक स्लॅपचा आवाज येऊ लागला व काही क्षणातच पूर्ण स्लॅप खाली पडला. त्यात शलाका पांजारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे पांजारी यांनी सांगितले. सदर प्रकार समजताच शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे व स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी या ठिकाणी धाव घेतली. महापालिकेला संपर्क करून संबंधित दुर्घटनेची कल्पना दिली. महापालिका अधिकारी यांनी या घराची पाहणी करत यावर लवकर उपाययोजना करण्यात येतील असे यावेळी मांडवे यांना सांगितले. या इमारती ३० वर्षा पूर्वी जुन्या असुन त्यांना फक्त बाहेरून मुलामा लावण्यात येत आहे. अंतर्गत त्यांचे खच्चीकरण होत असून याकडे पालिकेने गांभीर्याने बघणे गरजेचे असल्याचे मांडवे यांनी सांगीतले. इमारतीच्या भिंतीना तडे गेले असून अशा इमारती केव्हाही कोसळू शकतात अशी भीती यावेळी पांजारी यांनी व्यक्त केली. स्लॅप कोसळण्याच्या घटनेने सोसायटीतील अन्य सदनिकाधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकवार ऐरणीवर आला आहे.