इटीसी केंद्रातील गैरकारभाराची राज्यमंत्र्यांकडून चौकशी सुरु
हिवाळी अधिवेशनात इटीसी केंद्र, महापालिका आयुक्तांविरोधात आवाज उठविणार -आ.मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या बहुचर्चित इटीसी अपंग शिक्षण-प्रशिक्षण केंद्रातील गैरकारभाराविरोधात मुख्यमंत्र्यांकडे ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या तक्रारीची अखेर शासन स्तरावर घेण्यात आलेली आहे. इटीसी अपंग शिक्षण-प्रशिक्षण केंद्रात आजपर्यंत झालेला भ्रष्टाचार, पालकांना होणारा त्रास तसेच कर्मचार्यांचा होणारा छळ यासंदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने राज्याचे नगरविकास राज्यमंत्री ना. डॉ. रणजित पाटील यांनी इटीसी केंद्रातील गैरव्यवहारांची चौकशी सुरु केली असल्याची माहिती आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिली. दरम्यान, इटीसी केंद्रातील गैरव्यवहारांची शासनाच्या माध्यमातून चौकशी सुरु असताना दुसरीकडे याच केंद्रातील संचालिकेला महापालिकेचा पुरस्कार घेण्यासाठी पाठविले जाते याबाबतही आमदार म्हात्रे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करतानाच कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवरही शंका घेतली आहे.
महापालिकेच्या बहुचर्चित इटीसी अपंग शिक्षण-प्रशिक्षण केंद्राला आ. मंदाताई म्हात्रे यांनी यापूर्वी भेटी दिलेल्या आहेत. या भेटीदरम्यान इटीसी केंद्रातील भ्रष्टाचार, पालकांना होणारा त्रास, कर्मचार्यांची छळवणूक आदि प्रकार निदर्शनास आले. तसेच सदर केंद्रात हजारोंच्या संख्येत मुलांचे कपडे, शुज, स्कुल बॅगस् निदर्शनास येऊन तेथील रुम भाड्याने दिल्याचे समजले. त्यामुळे आमदार म्हात्रे यांनी इटीसी केंद्रातील गैरव्यवहारांविरोधात आ. मंदाताई म्हात्रे यांनी पुराव्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त यांच्यापासून संबंधितांकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत.
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या भेटीनंतर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा यांच्यासमवेत इटीसी केंद्राला भेट देउन तेथे उत्तररितीने कामकाज चालले असल्याचे जाहिर वक्तव्य केले होते. वास्तविक पाहता, आपण केलेल्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांनी चौकशी करु एव्हढेच सांगितले होते. पण, इटीसी केंद्रातील संचालिका वर्षा भगत यांना पदावरुन बाजुला साधी चौकशी करुन उत्तर देण्याचे सौजन्यही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दाखविले नसल्याचा आरोप आ. मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे आपण केलेल्या तक्रारीनंतर इटीसच्या प्रमुखांना तेथील रजिस्टरवरील कामकाज बदलले. पण, त्याअगोदरचे रजिस्टरमधील सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.
दरम्यान, इटीसी केंद्रातील गैरकारभाराची चौकशी सुरु असताना आयुक्त मुंढे यांनी आरोप असलेल्या संचालिकेलाच महापालिकेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पाठविले. त्यावेळी या आयुक्तांचा कायदा कुठे गेला? कायदा तुम्ही इतरांना शिकविता. त्यामुळे कायद्याच्या भाषा करणे तुम्हाला शोभत नसल्याचा टोलाही आमदार म्हात्रे यांनी आयुक्त मुंढे यांना लगावला आहे. चौकशी सुरु असताना इटीसी संचालिकेला पुरस्कार घेण्यासाठी पाठविणे म्हणजे राज्यमंत्र्यांचा अपमान आहे. साधी चौकशी देखील न करता इटीसी संचालिकेला क्लीनचिट मिळण्यासाठी महापालिका स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. सदरचा प्रकार शासनासह समस्त नवी मुंबईकरांचा अपमान करणारा असल्याने आपण येत्या हिवाळी अधिवेशनात इटीसी केंद्रातील गैरकारभाराचा विषय पुन्हा मांडणार आहोत. मग, इटीसीला वाचवायला बाप येणार की महापालिका? ते काळच ठरवेल, असे उघड आव्हान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विरोधकांसह महापालिका प्रशासनाला दिले आहे.