सध्या सर्व वर्तमानपत्र तसेच राज्य विधीमंडळाच्या गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नाव चुकीच्या पद्धतीने झळकत आहे. म्हणून सर्व आम जनतेतर्फे एक सर्वसाधारण वकील या नात्याने याची दुसरी बाजू येथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची दुसरी बाजू लोकांसमोर आली नाही आणि त्यामुळे आज जर जनता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक, सत्यनिष्ठ अधिकार्याच्या पाठीशी उभी राहिली नाही तर भविष्यात आपली पुढील पिढी आपणास कधीच माफ करणार नाही. तसेच भविष्यात कोणतीही प्रामाणिक व्यक्ती कितीही आयपीएस किंवा आयएएस या उच्च पदावरती गेली तरी ते या गुंड, दादागिरीच्या राजकारणात टिकाव धरु शकणार नाहीत.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी सानपाडा येथे एकत्रित बैठक घेवून १८ जुलै २०१६ रोजी नवी मुंबई शहर दणक्यात बंद केले. नवी मुंबई बंदचा निर्णय घेते वेळेस यांच्यापुढे मुळ मुद्दा ‘नवी मुंबई गावठाण विभागातील बेकायदेशीर बांधकामांचा’ होता. सध्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०१३ नंतर केलेले बेकायदेशीर बांधकाम नोटीसा देवून तोडण्यास सुरुवात केली होती आणि तीही सिडको हद्दीतील बांधकामे होती. (गावठाण नाही). त्यामुळे बेकायदा बांधकामांचा नाजूक प्रश्न नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचा असल्यामुळे त्याला एक वेगळे वळण लागले. त्यासाठी सर्व पक्षांचे नेते आपली पोळी भाजण्यास पुढे सरसावले. यामध्ये अशा लोकांची भर पडली ज्यांनी आपली घरे, गाळे बेकायदेशीरपणे एफएसआय करुन बांधली होती आणि ज्यांना महापालिकेने आधी सदर बेकायदेशीर बांधकाम तोडण्यास नोटीसा दिलेल्या आहेत. तसेच नागरीकांसाठी बांधलेल्या फुटपाथवर आणि रस्त्यावर बेकायदेशीरपणे भाजीवाले, फळवाले आणि इतर विक्रेते व्यवसाय करत होते. त्यांच्यावर सुद्धा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक कारवाई करुन आज नवी मुंबईतील सर्व रस्ते, फुटपाथ सर्वसामान्य जनतेसाठी खुले केलेले आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या सर्व कारवाईमुळे नवी मुंबईतील सर्व नेते मंडळींनी एकत्रित येवून नवी मुंबई बंद करण्याचा शो केला. परंतु, यामध्ये कोणत्याही सर्वसाधारण जनतेचा समावेश नव्हता हेही तितकेच सत्य आहे. यात बरेचसे राजकीय नेते मंडळी आणि मोठे व्यवसायिक यांच्या अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजावल्यामुळे आणि दंड वसुल केल्यामुळे ते सर्व महापालिका आयुक्तांविरोधात एकत्र आले. या सर्व प्रकरणात प्रकल्पग्रस्तांचा फक्त खांदा वापरला जात आहे. कारण आता १ जानेवारी २०१३ नंतर होणार्या बांधकामांमध्ये खरोखर प्रकल्पग्रस्त व्यक्ती नेमक्या किती आहेत?, असा एक मोठा प्रश्नच आहे. या मुळ प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी आधीच त्यांच्या
काही मुलांनी विकलेल्या असल्यामुळे तेथे इतर मोठमोठे व्यावसायीक, नेतेमंडळी यांचेच हितसंबंध उरलेले आहेत. या सर्व प्रकरणामध्ये वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, काही स्थानिक मराठी रहिवाशी ज्यांना काही उत्पन्नाचे साधन नाही ते आपल्या रहात्या घरांचा काही भाग व्यावसायिक भाड्याने देवून त्या उत्पन्नातून आपला प्रपंच चालवत होते. मात्र, या सर्व कारवाईमुळे त्यावर बंधन आले आहे. त्यामुळे वाईट वाटणे साहजिकच आहे. परंतु, या सर्व गोष्टीसाठी सरकारने पुढाकार घेवून त्या बाबतीत काहीतरी पर्याय काढून ते प्रश्न हाताळणे जरुरीचे आहे.
याशिवाय नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या १ जानेवारी २०१३ पूर्वीच्या बांधकामांबाबतही सरकारने पुढे येवून पर्यायी मार्ग काढणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी एकत्रित बसून सुटू शकतात. त्यासाठी नवी मुंबई बंद करुन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरती कारवाई करण्यास भाग पाडणार्या या नेत्यांना काय म्हणावे. नवी मुंबईतील नेतेमंडळींचे ऐकून आणि त्यांच्या दबावामध्ये येवून जनतेचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा साध्या, धाडसी, प्रामाणिक, पारदर्शी आणि कार्यनिष्ठ अधिकार्याची जर का उचलबांगडी केली तर मात्र सर्वसामान्य जनतेचा सरकारी यंत्रणेवरील, प्रचलित कायद्यावरील विश्वासच कायमचा उडून जाणार आहे. तसेच भविष्यात कितीही मोठा प्रामाणिक अधिकारी अशा पदावरती आला तरी तो अशा गुंडगिरी, दादागिरीच्या वातावरणात काहीच काम करु शकणार नाही आणि यापुढेही अशाच प्रकारे गुंडाराज, दादागिरी तसचे भ्रष्टाचार चालूच राहील.
आज चार महिन्यांच्या कालावधीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचा आढावा घेतला तर एक चांगला प्रशासकीय अधिकारी जर त्याला पूर्ण काम करण्याचे अधिकार दिले तर तो काय परिवर्तन करु शकतो याची प्रचिती आज सर्व नवी मुंबईतील नागरीकांना आलेली आहे. बरेच वर्ष या राजकारण्यांनी स्वतःच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे समाजाला भ्रष्टाचाराची लागण केलेली आहे. आज कोणत्याही सरकारी दप्तरावरील (सिडको, नवी मुंबई महापालिका) काम पैशाची लाच दिल्याशिवाय होत नाही, असे कटू सत्य आहे आणि या लाचखोरांची हाव दिवसेंदिवस वाढतच आहे. पण, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाडीच्या कारवाईमुळे नवी मुंबईतील प्रत्येक व्यक्ती चांगले घडण्याचा विचार करु लागला आहे. या सर्वांचे श्रेय सरतेशेवटी सर्वसामान्य जनता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना दिसत आहे. आपल्या देशाचे चांगले दिवस येण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासारख्या धाडसी, प्रामाणिक, पारदर्शी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकार्यांची सर्व ठिकाणी गरज आहे.
– ऍड. विलास दामोदर विचारे, नवी मुंबई.
साभार – दै. नवे शहर