नवी मुंबई: वाशीतील आयसीआयसीआय बँकेत गृहकर्जासाठी एका दाम्पत्याने बनावट कागदपत्रे सादर करुन बँकेकडून तब्बल ९६ लाख रुपयांचे कर्ज घेऊन सदर रक्कमेचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशी पोलिसांनी या दाम्पत्याविरोधात फसवणुकीसह अपहार आणि बनावट कागदपत्रे
तयार करणे आदि कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणातील दाम्पत्याने गत फेब्रुवारी महिन्यामध्ये आयसीआयसीआय बँकेच्या वाशी रेल्वे स्टेशन मधील शाखेमध्ये गृहकर्जासाठी कागदपत्रे सादर केली होती. त्यासाठी या दाम्पत्याने बँकेमध्ये बनावट कागदपत्रे सादर केली होती. बँकेने या दाम्पत्याच्या कागदपत्रावरुन त्यांना तब्बल ९६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन सदरची रक्कम त्यांच्या स्टँडर्ड चार्टर्ड बँक खात्यावर जमा केली. त्यानंतर या दाम्पत्याने सदरची रक्कम मिळाल्यानंतर सर्व रक्कमेचा परस्पर अपहार केला. मात्र, त्यानंतर या दाम्पत्याने बँकेचे हप्ते न भरल्याने बँकेने त्यांनी ज्या फ्लॅटसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते, त्या फ्लॅटवर जाऊन पाहणी केली. यानंतर सदरचा फ्लॅट दुसर्याच व्यक्तीचा असल्याचे बँक अधिकार्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे बँकेने दाम्पत्याने गृह कर्जासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता, सदरची कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दाम्पत्याने फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी राजेश अय्यर यांनत्सदर दाम्पत्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरुन बँकेची फसवणूक करणार्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर यांनी दिली.