सानपाडा : गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा ! अत्यंत श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावाने हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरी जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापूर्वीच घरात लगबग सुरु झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो,मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे,थर्माकॉलचे आकर्षक मकर असो वा गणेशाची सुंदर मूर्ती ! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते.
घरगुती गणपतींना होणारी हि सजावट लक्षात घेता सानपाडा युथ फाऊंडेशन आणि दैनिक पुण्यनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दिवंगत माजी नगरसेवक प्रकाश माटे यांच्या स्मरणार्थ व्हॉट्सअँप घरगुती गणेश सजावट स्पर्धा २०१६ हा नवा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमात सानपाडा विभागातील १५० ते २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा बुधवारी सानपाडा सेक्टर ६ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी दैनिक पुण्यनगरीचे नवी मुंबई – रायगड पुरवणीचे व्यवस्थापक शरद शिंदे व दैनिक पुण्यनगरीचे नवी मुंबई – रायगड पुरवणीचे वरिष्ठ उपसंपादक राजेश दाभोळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सानपाडा सेक्टर ५ येथील अंजली सोसायटीमध्ये राहणाऱ्या लता वाजगे यांनी नारळ व नारळाच्या झावळ्यांचा वापर करून नारळातील श्री गणेशाच्या मूर्तीचा सुंदर पर्यावरण पूरक व इकोफ्रेंडली देखावा साकारला. त्याबद्दल दैनिक पुण्यनगरीचे नवी मुंबई – रायगड पुरवणीचे व्यवस्थापक शरद शिंदे व दैनिक पुण्यनगरीचे नवी मुंबई – रायगड पुरवणीचे वरिष्ठ उपसंपादक राजेश दाभोळकर यांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम ३,३३३ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सन २०१५ साली झालेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेतही लता वाजगे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला होता.
सानपाडा सेक्टर ७ येथील शिवत्रिवेणी कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या निलेश हंचाटे यांनी शिलाईच्या दोऱ्यांचे व धाग्यांचे १२५०० रिळ,फेव्हिकॉल ७ किलो,डिझायनर लेस ३० मी,डिझायनर ८००० मणी यांचा वापर करून फक्त १५ दिवसांत सुंदर इकोफ्रेंडली सजावट केली. त्याबद्दल त्यांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोहन पन्हाळकर व समाजसेवक श्रीराम मढवी यांच्या हस्ते रोख रक्कम रुपये २,२२२ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सानपाडा सेक्टर ७ येथील शिवत्रिवेणी कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या हेरंब प्रधान यांनी वर्तमानपत्राचे १००० रोल बनवून इकोफ्रेंडली पद्धतीने सुंदर गणेश मंदिराची प्रतिकृती साकारली. त्याबद्दल त्यांना सानपाडा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश शेटे,सचिव अमन गोळे व सहखजिनदार विवेक कदम यांच्या हस्ते रोख रक्कम रुपये १,१११ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
चौकट –
पुढील वर्षी स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी गणेशाचे विसर्जन कृत्रिम तलावातच करून इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा आणि आयोजकांनी स्पर्धकांसाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करून द्यावी. जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल अशी सूचना दैनिक पुण्यनगरीचे नवी मुंबई – रायगड पुरवणीचे व्यवस्थापक शरद शिंदे यांनी मांडली. घरगुती गणेशांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
प्रतिक्रिया –
घरगुती गणपतींना होणारी सजावट लक्षात घेता गेली तीन वर्ष सानपाडा विभागात सानपाडा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून व्हॉट्सअँप घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले जाते.या वर्षी १५० ते २०० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व स्पर्धकांना धन्यवाद. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन.
– योगेश शेटे
(अध्यक्ष – सानपाडा युथ फाऊंडेशन)
मनोगत –
१. लता वाजगे (स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे मानकरी)
– या स्पर्धेमध्ये आम्ही पहिल्या क्रमांकाचे विजेते ठरलो. याचे संपूर्ण श्रेय हे माझ्या मुलांना जाते. त्यांनी केलेल्या उत्तम सजावटीमुळेच आज आम्हांला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
२. निलेश हंचाटे (स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी)
– गेली १० वर्ष आम्ही इकोफ्रेंडली पद्धतीने घरगुती गणेशोत्सव साजरा करत असतो.स्पर्धेमध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरलो.स्पर्धेमुळे आम्हांला नेहमी प्रेरणा मिळत राहील. आयोजकांचे मनापासून धन्यवाद.
३. हेरंब प्रधान (स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी)
– गेली ४५ वर्ष आम्ही घरगुती गणेशोत्सव साजरा करतो. स्पर्धेमध्ये आम्ही तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरलो. पुढील वर्षी यापेक्षा चांगल्या पद्धतीने इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आयोजकांनी आम्हांला चांगले व्यासपीठ मिळवून दिले. त्याबद्दल आयोजकांचे मनापासून धन्यवाद.
विशेष सहकार्य –
या स्पर्धेसाठी महेश मढवी,राजेश ठाकूर,मोहन पन्हाळकर,मिलिंद सूर्यराव,भाऊ भापकर,विवेक भालेराव,श्रीराम मढवी,अशोक कवडे,जयंत नाईक,रुपेश मढवी आदी मान्यवर मंडळींचे विशेष सहकार्य लाभले.