वाशी: कार्यालयीन शिस्तीवर भर देत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नियमानुसार कार्यप्रणाली राबविण्याकडे कटाक्ष असून त्यानुसार कामकाज करीत महापालिका कामकाजाला गतीमानता व सुनियोजितता प्राप्त झालेली आहे.
महापालिका आस्थापनेवरील दूरध्वनी चालक / समय लेखक या मूळ संवर्गातील सहा कर्मचा-यांना वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक या संवर्गात पदोन्नती देण्यात आली होती. तसेच वरिष्ठ लिपिक / कर निरीक्षक या संवर्गातून पदोन्नती करता आवश्यक अर्हता शिथिल करून अधिक्षक/वसुली अधिकारी या संवर्गात पदोन्नती देण्यात आली होती.
वास्तविकत: दूरध्वनी चालक व समय लेखक हे दोन्ही संवर्ग तांत्रिक सेवेतील संवर्ग असून त्यांना सेवा प्रवेश नियमानुसार पुढील पदोन्नतीची साखळी उपलब्ध नाही. त्यामुळे दूरध्वनी चालक हा मूळ संवर्ग असलेल्या श्रीम. अर्चना पै, श्रीम. ज्योती घनाते, श्रीम. सुरेखा वाडे, श्रीम. स्वप्ना पुजारी तसेच समय लेखक हा मूळ संवर्ग असलेल्या प्रकाश वाकचौरे व राहूल पगारे यांचे पदोन्नती आदेश रद्द करून दूरध्वनी चालक व समय लेखक या त्यांच्या मूळ संवर्गात पदस्थापना करण्यात आली आहे.
यामुळे महापालिका मुख्यालयासह वाशी, नेरुळ व ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांस दूरध्वनी चालक तसेच वाशी व ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयांस समय लेखक उपलब्ध होणार आहेत व तेथील संपर्क यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.