पोलीस कर्मचा-यांना भरचौकात धक्काबुक्की
- नागपूर :- राज्यातील पोलिसांवरील हल्ले काही कमी होताना दिसत नाहीत. चौकात पार्क केलेली कार हटविण्यास सांगितल्यामुळे एका युवकाने वाहतूक पोलीस कर्मचा-यांना मारहाण केल्याची घटना नागपूरात घडली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी झांशी राणी चौकात घडली.
-
तुषार वर्मा असे आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार तुषारने सकाळी ६.३५ वाजता झांशी राणी चौकातील पेट्रोल पंपाच्या कॉर्नरवर आपली कार पार्क केली होती. झांशी राणी चौकात सकाळच्या वेळी रिक्षाचालक आणि अवैध प्रवासी वाहनांची मोठी गर्दी होत असते. यासंबंधात तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती केली जाते. घटनेच्या वेळी एपीआय अमोल चव्हाण सहका-यांसह चौकातील वाहनांना बाजूला करीत होते. शिपाई ओंकार आणि नीलेशने तुषारला सुद्धा त्याचे वाहन (कार) हटविण्यास सांगितले. परंतु तुषारने नकार देत तो पोलीस कर्मचा-यांशी वाद घालू लागला. पोलीस कर्मचारी त्याचे चालान करून लागले असता तो असभ्य वागणुकीवर उतरला. दरम्यान अमोल नावाचा शिपाई या घटनेची मोबाईल रेकॉर्डिंग करीत होता. ते पाहून तुषारला आणखी राग आला. तो मोबाईल हिसकवण्याच्या प्रयत्नात अमोलला धक्का-बुक्की करू लागला. त्याने पोलीस कर्मचा-यांना पाहून घेण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचा-यांच्या सूचनेवर सीताबर्डी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस तुषारला ठाण्यात घेऊन गेले. मात्र, गुन्हा दाखल करण्याची माहिती होताच आरोपी युवक सीताबर्डी पोलीस ठाण्यातून गायब झाला. यामुळे पोलिसांत खळबळ उडाली.