नवी मुंबई ः महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशमुर्ती आणि विसर्जन करणार्या स्वयंसेवकांबद्दल केलेल्या विधानामुळे, अनंत चतुर्दशीच्या दिवशी नवी मुंबईतील विसर्जनस्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे यावर्षी श्रीमुर्तींचे विसर्जन निर्विघ्नंरित्या पार पडले.
दरम्यान, गौरी-गणपती विसर्जनावेळेस उपस्थित राहिलेले महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि बहुतांश विभाग प्रमुख अनंत चतुर्दशीच्या दिवशी मात्र नवी मुंबईतील विसर्जनाच्या ठिकाणी अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. १५ सप्टेंबर रोजी विसर्जनाच्यावेळी नवी मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी महापालिका आयुक्तांना शहरात न फिरण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जात आहे.
महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर वेगवेगळ्या प्रकरणात वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या मुंढे यांचा गौरीगणपती विसर्जनाच्या वेळी मुर्तीचे विसर्जन करणार्या स्वयंसेवकांसोबत नागरिकांकडून श्रींच्या विसर्जनासाठी पैसे घेण्यावरुन वाद झाला होता. यावेळी आयुक्तांनी केलेली वक्तवे वादग्रस्त ठरल्याने दुसर्या दिवशी महापालिका प्रशासनाने आयुक्त असे काही बोललेच नाही, असा खुलासा केला. मात्र, आयुक्त आणि स्वयंसेवकांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबईत परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. सदर घटनेचे पडसाद अनंत चतुर्दशीच्या दिवशी उमटण्याची शक्यता पोलिसांना आल्याने सर्व विसर्जन स्थळांवर पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. तर श्रींचे विसर्जन करणार्या स्वयंसेवकांनी महापालिका आयुक्त मुंढे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आपली नाराजी दाखवून दिली.
श्रींचे विसर्जन करताना नागरिकांनी स्वखुशीने दिलेल्या देणग्या देखील स्वयंसेवकांनी घेतल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. तर नागरिकांनीही विसर्जनाकरिता देणग्या देवू नयेत, असे आवाहन पोस्टर्सच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाने शहरभर केले. आयुक्तांच्या वक्तव्यामुळे आधीच संतापलेल्या स्वयंसेवकांनी जोपर्यंत शहरातील सदरचे पोस्टर्स काढले जात नाहीत, तोपर्यंत विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली. तर आग्नशमन दलाच्या जवानांवर विसर्जनाची जबाबदारी देण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेवर पण आक्षेप घेण्यात आला. अखेरीस श्री विसर्जनाच्या सदर गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर स्वयंसेवकांनी श्रींचे विसर्जन करण्यास तयारी दर्शविली. यानंतर विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने गेली अनेक वर्षापासून मुर्तीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करणार्या स्वयंसेवकांना फक्त ३०० ते ४०० रुपये मानधन दिले जाते. या कमी मानधनात आपला जीव धोक्यात टाकून स्वयंसेवक काम करीत असतात. मुर्ती विसर्जनाच्या वेळी भाविक तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी स्वखुशीने स्वयंसेवकांना देणगी देत असतात. गौरी-गणपतीच्या विसर्जनावेळी देणगी घेण्यास मुंढेंनी बंदी घातल्याने वादाला तोंड फुटले. परंतु, अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांच्या या शिष्टाईमुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात नवी मुंबईकरांनी बाप्पाला निरोप दिला.