* तक्रारींवर ७ ते १५ दिवसामध्ये कार्यवाही
* जबाबदारी ओळखून नागरिकांचे वर्तन असावे
नवी मुंबई: नवी मुंबईत पार्कींगची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत असून
त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने गतिमान पावले उचललेली
आहेत. याकरीता वाणिज्य संकुलांमध्ये पार्कींगच्या जागा खुल्या करण्यात येत आहेत. याशिवाय एक मार्गी पार्कींग, नोपार्कींग झोन, पार्कींग प्लॉटचा विकास अशा विविध माध्यमातून पार्कींगचे नियोजन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याकामी नागरिकांनीही संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
१७ सप्टेंबर रोजी चिंचोली तलाव शिरवणे येथील येथील ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता, पाणी पुरवठा, बांधकाम, विद्युत, अतिक्रमण, आरोग्य, उद्यान, परवाने अशा विविध विषयांवर नागरिकांच्या तक्रारी, सूचना, संकल्पना जाणून घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावर जलद कार्यवाही करण्याच्या कामांबाबत ७ ते १५ दिवसात कार्यवाही होऊन धोरणात्मक बाबींविषयीच्या सूचनांबाबत योग्य कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमातून नागरिकांशी संवाद साधता येतो, त्यांच्या अडीअडचणी, प्रतिक्रिया जाणून घेता येतात असे सांगत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या नवी मुंबई शहरात उत्तम शहर होण्याची क्षमता असून याकामी सर्व घटकांचे योग्य सहकार्य आवश्यक असून नागरिकांचा विकासात्मक सहभाग अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.
कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी ओला आणि सुका कचर्याचे वर्गीकरण केले जाणे देखील आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यासाठी महत्वाची बाब आहे. कमीत कमी कचरा निर्माण होईल याकडे नागरिकांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. तसेच रस्त्यावर किंवा कोठेही कचरा टाकू नये. कुठेही थुंकू नये. अशाप्रकारे नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून आपले वर्तन असावे, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी यावेळी केले.
भारतातील अनेक शहरांमध्ये प्रतिदिन १०० लिटर पाणीही प्रति माणसी मिळत नाही. १३५ लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन असे राष्ट्रीय मानक असतानाही नवी मुंबईत साधारणत: १५० लिटर प्रतिदिन प्रति व्यक्ती पाणी महापालिका देत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक एवढेच पाणी वापरून पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. पाणी म्हणजे जीवन आहे ते जाणून आपल्याकडील उपलब्ध जलसाठा वर्षभर पुरेल अशाप्रकारचे जलनियोजन असायला हवे आणि त्यादृष्टीने पावले उचलली जात असल्याचे मुंढे यांनी सांगितले.