* व्यवस्थापनाच्या कामांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा
* मनसेची महापालिका आयुक्तांकडे मागणी
* कामात भ्रष्टाचार झाल्याचा संदीप गलुगडे यांचा आरोप
नवी मुंबई : महापालिका हद्दीत दिघापासून बेलापूरपर्यंत वीजवाहिन्या भूमीगत
करण्यासाठी सुमारे २११ कोटी रुपयांची तसेच जीपीआरएस तंत्रज्ञानावर आधारित दिवाबत्ती व्यवस्थापनाची ५ कोटी २२ लाखाची कामे, महापालिकेने टप्प्याटप्प्याने कंत्राटी पध्दतीने दिली होती. मात्र, वीज वाहिन्या भूमीगत करण्याची आणि जीपीआरएस तंत्रज्ञानावर आधारित दिवाबत्तीची कामे अत्यंत दर्जाहिन, चुकीच्या पध्दतीने आणि नित्कृष्ट झाली असल्याची बाब व्हीजेटीआय संस्थेच्या सर्व्हेक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सदर कामांची जबाबदारी महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख तथा सह-शहर अभियंता जी. व्ही. राव यांच्यावर असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करुन संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची तर्फे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिकेने पुन्हा सदर कामांचे सर्व्हेक्षण करुन ज्या ज्या ठिकाणी नित्कृष्ट आणि धोकादायक कामे झाली आहेत, ती तात्काळ दुरुस्त करावीत, अशी मागणीही ‘मनसे’च्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित महापालिका अधिकार्यांनी आणि कंत्राटदारांनी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करीत नमूद कामांमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप ‘मनसे’चे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
शून्य पॉईंटपासून सात मीटरपर्यंत खोल वीजवाहिन्या अपेक्षित असताना, जास्त खोल खोदकाम न करता वीजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. तसेच काही गावांमध्ये भूमीगत वीजवाहिन्या उघड्यावर तर आग्रोळी गांव येथे गटारातून वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित परिसरामध्ये निकृष्ट वीजवाहिन्यांमुळे भविष्यात दुर्घटना घडल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असे ‘मनसे’ने निवेदनात नमूद केले आहे.
याशिवाय जीपीआरएस तंत्रज्ञानावर आधारित दिवाबत्ती व्यवस्थापनाच्या कामात नमूद ३५ केव्ही क्षमतेच्या कॉईल्सऐवजी कमी क्षमतेच्या कॉईल्स वापरण्यात आल्याचे व्हीजेटीआयच्या अहवालात म्हटले आहे. परिणामी, काही ठिकाणी सदरची प्रणाली बंद पडली असून वीज बचतीच्या नावाखाली कंत्राटदारावर ४ कोटींची बिले देऊन मेहेरनजर करण्यात आल्याचे संदीप गलुगडे यांनी सांगितले.
एकंदरीत कामांची सद्यस्थिती बघता वीजवाहिन्या भूमीगत करण्याच्या तसेच जीपीआरएस तंत्रज्ञानावर आधारित दिवाबत्ती व्यवस्थापनाच्या कामांची चौकशी करुन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संदीप गलुगडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.