२०१६ मध्ये ३९८ जणांना डेंग्यूची लागण
१५७३ डेंग्यूचे संशयित रूग्ण
मुंबई : डेंग्यूला कारणीभूत ठरणार्या ‘एडिस इजिप्ती’ डासांच्या उत्पतीला सध्या पोषक वातावरण असल्यानं मुंबईत डेंग्यूचे वादळ घोंघावतंय. आतापर्यंत मुंबईत डेंग्यूमुळं दोघांचा मृत्यू झालाय. तर रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसतंय.
पावसाळा संपत आला की दरवर्षी मुंबईला डेंग्यूंचा सामना करावा लागतो. यावर्षीही डेंग्यूनं हजेरी लावली आहे. सप्टेंबर महिन्यात १२२ जणांना डेंग्यू झालाय. तर १५७३ जण डेंग्यूचं संशयित रूग्ण आढळलेत. मुंबईत २०१६ मध्ये आतापर्यंत ३९८ जणांना डेंग्यूची लागण झालीय.
ही केवळ पालिका रूग्णालयांतील आकडेवारी असून खाजगी रुग्णालयांमधील आकडेवारी यापेक्षा अधिक असू शकते. मुंबई महापालिकेनं केलेल्या तपासणीत झोपडपट्टी परिसरात ’एडिस इजिप्ती’ डासांची १,८२८ तर इमारतींच्या परिसरात ७,११८ उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत.
म्हणजे झोपडपट्टींच्या तुलनेत इमारतींच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थाने तब्बल चार पटीने अधिक असल्याचे आढळलंय. ज्यांच्या घरात डासांची उत्पत्तीस्थानं आढळली आहेत. अशा १३,५९३ जणांना बीएमसीकडून नोटीस देण्यात आली आहे. तर ९२७ प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई केली जात असून २६ लाख ९२ हजार रुपये एवढा दंड कायदेशीर प्रक्रियेनुसार वसूल केलाय.
डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणारे डास साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात. तसंच या डासांची या पाण्यातील अवस्था आठ दिवसांची असते. यामुळं घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी आठवडयातून किमान एक दिवस तरी पूर्णपणे कोरडी करावीत. तसंच फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे, घराच्या सज्जामध्ये अथवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणार्या प्लेट्स, वातानुकुलन यंत्रणा, रेफ्रिजरेटरचा डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या विविध बाबींमध्ये असलेल्या थोड्याशा स्वच्छ पाण्यात देखील डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येतात.
तसंच बाहेरील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते आणि या स्वच्छ पाण्यातही डेंग्यूचे विषाणूवाहक डास अंडी घालतात. मुंबई महापालिकेकडून डेंग्यूवर आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी मुंबईकरांनीही याविषयी जागृत राहणं गरजेचे आहे.