आमदार मंदाताइ म्हात्रे यांची सिडको व्यवस्थापनाकडे मागणी
श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई व ठाणे तालुक्यातील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करण्याबाबत सिडको प्रशासनाने घेतलेला निर्णय त्वरित मागे घेऊन नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन यापुढेही चालू ठेवण्यात यावे, या मागणीसाठी ‘बेलापूर’च्या आमदार मंदाताइ म्हात्रे यांनी ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना साकडे घातले आहे.
नवी मुंबई शहर वसविण्यासाठी शासनाने सिडको महामंडळासाठी नवी मुंबई-ठाणे तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या १०० टक्के जमिनी संपादित करुन त्यांना भूमीहिन केले आहे. ‘सिडको’कडून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरिता विद्यावेतन दिले जाते. सदर विषय प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. नवी मुंबई- ठाणे तालुक्यामधील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या, प्रश्न आजही
‘सिडको’च्या अनास्थेमुळे प्रलंबित आहेत. अशा प्रकल्पग्रस्त विद्यावेतन बंद करण्याबाबतचा निर्णय न घेण्याबाबतच्या संदर्भात सिडकोला यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला होता. पण, तरीही सिडको प्रशासनाने नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला असल्याची खंत आ. मंदाताई म्हात्रे यांनी त्यांच्या पत्रात व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे सिडको प्रशासनाने नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे
विद्यावेतन बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय येणार्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्याचे प्रस्तावित केले असल्याचे समजते. त्यामुळे प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून जिव्हाळ्याचा असलेल्या नवी मुंबई-ठाणे तालुक्यामधील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करण्याचा कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी करणारे पत्र आ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आणि सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांना दिले आहे.