उरणमध्ये चार संशयित अतिरेकी
दोन मुलींमध्ये पोलीस यंत्रंणा सावध
नवी मुंबई ः उरण परिसरात २२ सप्टेंबर रोजी अतिरेकी घुसल्याच्या बातमीने नवी मुंबईसह संपूर्ण देश हादरला गेला आहे. उरणमध्ये २२ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दहावीतील मुलीने कुंभारवाडा परिसरात चार संशयितांना हातात शस्त्रे आणि पाठीवर भरलेल्या बॅगांसह पाहिले. सदर चौघेजण आपण दोन गटांनी शाळा आणि ओएनजीसीवर अटॅक करु असे बोलल्याचे सदर मुलीचे म्हणणे आहे. तर त्याचवेळी अकरावीमध्ये शिकणार्या मुलाने देखील बोरी नाक्यावर एकाला अशाच पेहरावात पाहिल्याची माहिती समजताच नवी मुंबई पोलीस यंत्रणेसह देशातील अन्य सुरक्षा यंत्रणा सदर माहितीच्या शोध कार्यात लागले. परिणामी, नवी मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र हाय अलर्ट केला गेला आहे. उरणमधील ज्या मुलीने सदर संशयितांना पाहिले तेव्हा तिने याबाबतची माहिती तातडीने शाळेत शिक्षकांना दिली. त्यानंतर सदर माहिती शाळेने पोलिसांना सांगितली. तर पोलिसांनी याबाबत नौदलाला माहिती देत त्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. सदर माहिती प्रथम अफवा असल्याची चर्चा नवी मुंबईत होती. कदाचित नेव्हीचे मॉक ड्रिल असावे असा कयास पोलिसांद्वारे लावला गेला. मात्र, दोन्ही विद्यार्थी आपल्या मतावर ठाम राहिल्याने तपास चक्रे वेगाने फिरु लागली. पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांकडून अधिक माहिती घेत पोलीस आणि नौदलाच्या पथकाने संयुक्तरित्या उरण शहर परिसरात शोध मोहिम सुरु केली आहे. त्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला.
काश्मिरमधील उरी येथील आर्मी तळावरील अतिरेकी हल्ल्याची घटना ताजी असताना उरणमध्ये काही संशयित अतिरेकी पाहिल्याची माहिती मिळाल्याने नवी मुंबई आणि परिसरात वातावरण तंग झाले होते. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केल्यामुळे खरोखरच अतिरेकी घुसले तर नाही ना याबाबत लोकांमध्ये चर्चा सुरु झाली. प्रारंभी सदरची अफवा असावी अशी चर्चा सुरु होती. मात्र, पोलिसांनी वारंवार केलेल्या चौकशीनंतर तसेच जागेवर जाऊन केलेल्या पाहणीनंतर काहीतरी असावे असा अंदाज आल्याने पोलीस तपासासाठी सक्रिय झाले आहेत.
उरण परिसरामध्ये असलेले अतिज्वलनशिल साठे, त्याचप्रमाणे नौदलाचे शस्त्रागार, देशातील प्रमुख जेएनपीटी बंदर यामुळे उरण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील परिसर मानला जातो. त्यामुळे अनेकदा सदर परिसरात सागरी मार्गाने मॉक ड्रिल करुन सुरक्षा व्यवस्था तपासली जाते. त्यामुळे कदाचित सदरचा प्रकार नेव्हीद्वारा मॉकड्रिलचा प्रकार असावा, असा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, मॉकड्रिल केल्याबाबत कोणत्याही सुरक्षा यंत्रणेने दुजोरा न दिल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे तसेच नवी मुंबईची संपूर्ण पोलीस यंत्रणा सदर घटनेच्या तपासामागे लागली.
दरम्यान, सदर घटनेनंतर सुरु झालेल्या अफवांमुळे तसेच शाळेत अतिरेकी
शिरल्याची अफवा वार्यासारखी पसरल्याने शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये रिकामी करण्यात आली. तसेच दुपारची शाळा न भरविण्याचा
निर्णय संस्था चालकांनी घेतला. त्यानंतर नौदलाच्या खास हेलिकॉप्टर मधून ज्या शाळेच्या परिसरात अतिरेकी दिसले होते, त्या परिसराची पाहणी करण्यात आली.
यावेळी पोलिसांच्या विशेष पथकालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, सदर घटनेच्या अनुषंगाने कोणाही नागरिकास संशयीत व्यक्ती अथवा संशयास्पद हालचाली आढळून आल्यास त्याची माहिती त्वरित उरण पोलिसांना किंवा १०० नंबरवर देऊन पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले आहे.