सिडकोने केली एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार
नवी मुंबई : नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील बामणडोंगरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ टाकण्यासाठी ‘सिडको’च्या वतीने टाकण्यात आलेली सुमारे पावणे पाच लाख रुपये किंमतीची माती अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एनआरआय पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेरुळ ते उरण दरम्यान नवीन रेल्वे मार्ग सुरु करण्यात येत असून सध्या सदर रेल्वे मार्गावर रेल्वे रुळ टाकण्याचे काम सुरु आहे. ‘सिडको’ने नेरुळ उरण या नवीन रेल्वे मार्गावर २००८ पासून मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकला होता. उलवे भागातील बामणडोंगरी या ठिकाणी देखील ‘सिडको’च्या वतीने भराव टाकण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये बामणडोंगरी रेल्वे स्थानकाजवळ टाकण्यात आलेला मातीचा भराव अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.
सध्या रेल्वेकडून नेरुळ-उरण या रेल्वे मार्गावर रेल्वे रुळ टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, बामणडोंगरी भागातील रेल्वे रुळासाठी टाकण्यात आलेली मातीच चोरीला गेल्याने रेल्वे रुळ टाकायचे कुठे? असा प्रश्न ठेकेदाराला पडला आहे. सदर बाब ‘सिडको’च्या निदर्शनास आणल्यानंतर ‘सिडको’च्या अधिकार्यांनी याबाबतची तक्रार एनआरआय पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी सदर मार्गावरील माती चोरणार्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी नेरुळ उरण रेल्वे मार्गावर टाकलेली सुमारे पावणे पाच लाख रुपये किंमतीचा मातीचा भराव चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे.