शहरामध्ये पाण्याची बोंबाबोंब का आहे?
ऐरोली-दिघ्यापर्यत पाणी का पोहोचत नाही?
नवी मुंबई: मुंबई महापालिकेपाठोपाठ स्वत:चा धरण असल्याचा टेंभा मिरविणार्या नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत मात्र सर्वत्र पिण्याच्या पाण्याबद्दल
बोंबाबोंब आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रति माणसी १३५ लिटर पाणी देण्याचा फतवा चार महिन्यांपूर्वी काढून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे शहरात नागरिक मुबलक पाण्यासाठी महापौर, आयुक्त, लोकप्रतिनिधींसह सर्वांकडे विनवण्या करीत असताना देखील नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक बघितलेले नाही.
अपुर्या पाणी पुरवठ्यामुळे स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधींनाच साकडे घालत असल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्र्रेसच्या नगरसेविका तथा माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांनी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर बुधवारी महासभेदरम्यान महापालिका
प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान, केंद्र शासनाच्या सीपीएचयुने पाणी पुरवठा अथवा पाण्याच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शक सुचना केलेल्या आहेत. त्या सूचना म्हणजे आदेश नसल्याचे स्पष्ट करतानाच, महापालिका प्रशासनाने सीपीएचयुच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेत हुकूमशाही पध्दतीने पाणी पुरवठ्याचे धोरण आखून नवी मुंबईकर नागरिकांना पाण्याच्या बाबतीत वेठीस धरण्याच्या केलेल्या प्रयत्नांचा जाहिर शब्दात निषेध केला. अखेरीस नागरिकांना दोन वेळा मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाला द्यावे लागले.
गतवर्षी राज्यात सर्वत्र पाऊस कमी बरसल्याने पाण्याच्या नियोजनासाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात जूनपर्यंत पाणी पुरेल एव्हढा पाणीसाठा असतानाही नोव्हेंबर २०१५ पासून पाणी कपातीचे धोरण आखण्यात आले होते. पण, यंदाच्या मोसमात पाऊस सर्वत्र चांगलाच बसरला असून बहुसंख्य ठिकाणी असलेले पाणी कपातीचे संकट देखील दूर झाले असून त्याची अंमलबजावणीही काही महापालिकांकडून करण्यात आली आहे. असे असले तरीही स्वत:च्या मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबई महापालिकेने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार मात्र गत चार महिन्यांपासून शहरात प्रति माणसी १३५ लिटर पाणी पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले आहे. शिवाय पाण्याचा दाब देखील कमी केल्याने काही इमारतींच्या वरच्या मजल्यावर पाणी पोहचेनासे झाले आहे. परिणामी, यापूर्वी २-३ तास घरात येणारे पाणी आता जेमतेम १५ मिनिटेच येत असल्याने नवी मुंबईकरांची अपुर्या पाणी पुरवठ्यामुळे गैरसोय झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष स्थानिक नगरसेवकांना पत्करावा लागत आहे. यासंदर्भात पाणी पुरवठा विभागातील अधिकार्यांकडे तक्रार करताच ते आयुक्तांकडे बोट दाखवून हात वर करीत असल्याचा प्रकार सातत्याने घडत असल्याचे नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी २१ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेदरम्यान सांगितले.
वास्तविक पाहता सीपीएचयुची मार्गदर्शक तत्वे अंतिम आदेश नसताना देखील महापालिका प्रशासनाने १३५ लिटर पाणी देण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला असल्याचा सवाल उपस्थित करीत यासंदर्भात मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियमातील कलम ६८ (१) अन्वये प्रशासनाने
महासभेची मंजुरी घेतली का? असा संतप्त सवाल नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी यावेळी उपस्थित केला. १३५ लिटर पाणी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी महासभेचा असताना प्रशासनाने हुकूमशाहीने निर्णय घेऊन कशासाठी नवी मुंबईकरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे? महासभेत प्रस्ताव का आणला नाही? असे प्रश्न उपस्थित करुन नेत्रा शिर्के यांनी सदर विषयावर महापालिका प्रशासनालाच धारेवर धरले.
अखेरीस महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी सभागृहात पाणी पुरवठ्याविषयी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. पण, १३५ लिटर पाणी देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाबद्दल डगांवकर सभागृहात ठामपणे बोलू शकले नाहीत. यापूर्वी नवी मुंबई शहरासाठी मोरबे धरणातून ४१० एमएलडी पाणी पुरवठा केला जात होता. पण, दुष्काळी परिस्थिती आणि कमी पावसामुळे मोरबे धरणाची पातळी ६३ मीटरपर्यंत खोल गेल्याने गत नोव्हेंबर २०१५ पासून नवी मुंबईत पाणी कपात करण्यात आली. तरीही महापालिकेमार्फत शहरात दररोज २३४ लिटर प्रमाणे ३३० एमएलडी पाणी पुरवठा केला जात असल्याचे शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी सांगताच नेत्रा शिर्के यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. दररोज २३४ लिटर पाणी पुरवठा केला जात असतानाही शहरात पाण्यासाठी बोंबाबोंब होत असून घणसोली, ऐरोलीपर्यंत पाणी का पोहोचत नाही? असा सवालही शिर्के यांनी सभागृहात उपस्थित करुन प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर दिघापर्यंत पाणी पोहोचविताना मोठ्या प्रमाणावर गळती होत असून काही ठिकाणी अनधिकृत नळजोडणी, पाण्याचे ऑडीट, एनर्जी ऑडीट होण्याची गरज डंगावकर यांनी बोलून दाखवत वेळ मारुन नेली.
**
नवी मुंबईकरांचे पाणी कोण पळवतोय?…
सीबीडीपासून दिघापर्यंत पाणी पोहोचविताना मोठ्या प्रमाणावर गळती होत असेल तर प्रशासनाने सर्वप्रथम ती गळती शोधण्याचा प्रयत्न करावा. प्रशासन दररोज प्रति माणसी २३४ लिटर म्हणजे ३३० एमएलडी पाणी पुरवठा करीत असेल तर नागरिकांना १३५ लिटरच पाणी का वितरीत होते? त्यामुळे सर्व नवी मुंबईकरांचे पाणी कोण पळवतोय? की ते पाणी परत मोरबे धरणात जाते ते आधी शोधा. पाणी चोराला पकडा; पण नवी मुंबईकरांना वेठीस धरु नका, असा उपरोधिक टोला महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका प्रशासनाला लगावला.