रविवारी एपीएमसीत माथाडी मेळावा
नवी मुंबई : माथाडी कायद्याचे आणि संघटनेचे जनक अण्णासाहेब पाटील
यांच्या जयंती निमित्त येत्या २५ सप्टेंबर रोजी एपीएमसीमध्ये माथाडी कामगार
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबईत
माथाडींच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
१५ वर्षे आघाडी शासनाने फक्त आश्वासनावर बोळवण केल्यामुळे भाजपा सरकार माथाडींचे प्रश्न प्रत्यक्षात सोडविणार का? याकडे माथाडी कामगारांचे लक्ष लागले आहे. सदर मेळाव्यात मुख्यमंत्री कामगारांचे अनेक प्रश्न सोडविण्याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माथाडी मेळाव्यामध्ये दरवर्षी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. यामध्ये वडाळामधील घरांच्या बांधकामामधील अडचणींचाही समावेश आहे. याशिवाय बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, लातूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, कोल्हापूर येथील माथाडी कामगारांना घरे उपलब्ध करून देणे. माथाडी बोर्डामधील रिक्त सदस्यांची पदे भरण्यात यावीत. सुरक्षा रक्षक मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी. बाजार समितीच्या बाहेरील माथाडी स्वरूपाची कामे माथाडी कामगारांना देण्यात यावीत. माथाडींच्या मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे.
माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी आयुष्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे आणि आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मराठा समाजाला दिलासा देणारी काही आश्वासने देण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना जाहिर करण्याची शक्यताही असून मुख्यमंत्री नक्की काय भूमिका घेणार? याविषयी माथाडी कामगारांमध्ये उत्सुकता शिगेेला पोहचली आहे.