* पाणीपुरवठ्यावर दरवर्षी 53 कोटीचे नुकसान
* 135 कोटी खर्च, 82 कोटीची वसूली
नवी मुंबई: नवी मुंबईकरांना होत असलेल्या पाणी पुरवठ्यावर महापालिका वर्षाला 135 कोटी रुपये खर्च करीत असून पाणी बिलापोटी वार्षिक 82 कोटी रुपये महापालिकेला महसूल मिळत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर महापालिकेला वार्षिक 53 कोटीचे नुकसान सोसावे लागत आहे. सदरचे नुकसान भरुन काढण्यासाठी पाणी वापराच्या नियोजनाबरोबरच पाण्याच्या दरांचे वर्गवारीनुसार सुसूत्रीकरण करताना सुधारित पाणी दरपत्रक आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडणार
असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत राबविलेल्या प्रकल्पातील अटी-शर्तीमुळे पाणी पुरवठ्यात होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी प्रशासनाने सदरचे पाऊल उचलले असल्याचे आयुक्त मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे गत नोव्हेंबरपासून पाणी कपातीचा सामना करणार्या नवी मुंबईकरांवर आता पाणी दरवाढीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भर पावसाळ्यात नवी मुंबईकरांना होत असलेल्या अपुर्या पाणी पुरवठ्यामुळे गेले दोन महिने सर्वसाधारण सभेत सदस्यांनी आपल्या भावना तीव्र करीत प्रशासनाला लक्ष्य केले आहे. प्रतिदिन प्रति माणसी 135 लिटर पाणी प्रशासनाकडून नवी मुंबईकरांना पुरविले जात असल्याचा आरोप सदस्यांनी सभागृहात करुन प्रशासन सर्वसाधारण सभेच्या परवानगीविना हुकूमशाही पध्दतीने नागरिकांना पाणी पुरवठा करु शकत नाही. तसेच एएमआर (अॅटोमॅटिक मीटर रीडर) पध्दतीचे मीटर लावण्याबाबत प्रशासन नागरिकांना जबरदस्ती करु शकत नसल्याचे सांगत सदस्यांनी प्रशासनाच्या भूमिकेला विरोध केला होता.
नवी मुंबई शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात सदस्यांच्या भावना आणि त्यांनी केलेले आरोप तसेच सध्या शहरात होत असलेल्या पाणी पुरवठ्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी 22 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन एकंदरीत नवी मुंबईतील पाणी परिस्थितीची माहिती दिली.
नवी मुंबई शहरात 24 तास 7 सातही दिवस पाणी पुरवठा करण्यासाठी तसेच जेएनयुआर योजनेनुसार शहरात 15 मि.मी. पर्यंत व्यासाच्या घरगुती आणि वाणिज्य वापराच्या एकूण 84,390 नळ धारकांना एएमआर पध्दतीचे मीटर महालिकेच्या वतीने बसविण्यात आलेले आहेत. मात्र, भविष्यात होणारी पाणी गळती रोखण्यासाठी 15 मि.मी. पेक्षा जास्त व्यासाच्या नळ जोडणीधारकांनी स्वखर्चाने एएमआर मीटर बसवून घेण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
मोरबे धरणाची प्रति दिन 450 दललक्ष लिटर पाणी पुरवठा करण्याची क्षमता असून, सन 2041 पर्यंत शहराची वाढती लोकसंख्या विचार करता सुमारे 30 लाख लोकसंख्येच्या गरजेप्रमाणे मोरबे धरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2015 पासून शहराला 330 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहराच्या 14 लाख लोकसंख्येचा विचार करता, प्रति दिनी प्रति माणसी 234 लिटर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सदस्यांनी 135 लिटर प्रती
माणसी प्रति दिन पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचा प्रशासनावर केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
सध्या नवी मुंबई शहराच्या लोकसंख्येचा विचार करता आवश्यकतेपेक्षा जास्त पाण्याचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 21 सप्टेंबरपर्यंत शहरातील 10,404 अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी त्यांच्या नळजोडणीवर बसविलेले पंप देखील काढण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
सध्या 57 टक्के भागात 24 तास सातही दिवस पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. संपूर्ण शहराला 24 तास पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 15 मि.मी.पेक्षा जास्त व्यासाच्या नळ जोडण्यांना ए.एम.आर मीटर येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत बसविण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या असल्याचे सांगत मोरबे धरणापासून शहरात होणार्या पाणी पुरवठा आणि त्यासाठी लागणार्या यंत्रणेवर महापालिकेला प्रति वर्षी 135 कोटी खर्च होत आहे. मात्र, ग्राहकांना होत असलेल्या एकूण पाणी पुरवठ्याची वसुली 82 कोटी आहे. त्यामुळे महापालिकेला पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून प्रति वर्षी 53 कोटीचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे तुकाराम मुंढे यावेळी म्हणाले.