नवी मुंबई: शहर विकास प्रक्रियेत सर्वांचा सामुहिक सहभाग अपेक्षित आहे. याच संकल्पनेच्या अनुषंगाने नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सूचना, संकल्पना जाणून घेत त्याचा शहर विकासात उपयोग व्हावा अशी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमामागील भूमिका असून नागरिकांनी शहर विकासात आपले संपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन करीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला.
८ ऑक्टोबर रोजी वाशी, सेक्टर-२९, येथील राजीव गांधी उद्यानात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ेते. यावेळी नागरिकांनी विशेषत्वाने पावसाळी नाला, पार्कींग, स्वच्छता, रस्ते, पदपथ, पाणी पुरवठा, विद्युत पथदिवे, अतिक्रमण, उद्यान विषयीच्या आपल्या तक्रारी आणि सूचना आयुक्तांपुढे मांडल्या.
महापालिका नागरी सुविधा पुरविण्याची आपली जबाबदारी पार पाडत असताना जनतेही आपली नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा आयुक्त मुंढे यांनी यावेळी व्यक्त केली. ज्यावेळी पार्कींगची समस्या आपण मांडतो; त्यावेळी त्या गाड्या आपल्यापैकीच कुणाच्या तरी असतात ते लक्षात घेतले पाहिजे. याकरीता सोसायटीमधील पार्कींगच्या जागा त्याच कारणाकरीता वापरल्या जाणे गरजेचे असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. महापालिका संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रासाठी पार्कींगचे धोरण तयार करीत असून त्याद्वारे पार्कींगचा प्रश्न बर्याच प्रमाणात निकाली निघेल, असेही त्यांनी सांगितले.
मोरबे धरणामुळे आपल्याला जलसमृध्दी लाभलेली असली तरी पाण्याचा योग्य तेवढाच वापर करणे प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. मोरबे धरणाचा ४५० द.ल.लि. प्रतिदिन क्षमता साधारणत: ३० लाख लोकसंख्या नजरेसमोर ठेवून आहे. त्यामुळे आपल्याच भविष्याचा विचार करून आपण आजच्या लोकसंख्येला पुरेल असे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगत २४ तास पाणी पुरवठ्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याकरीता वापरलेल्या पाण्याच्या अचूक मोजमापासाठी ए.एम.आर. मीटर बसवून घेणे गरजेचे असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. त्या बरोबरीनेच प्रक्रियायुक्त पाण्याच्या पुर्नवापरावर भर दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, ओला-सुका कचरा नागरिक पातळीवरच वर्गीकृत होणे गरजेचे असल्याचे सांगत यामुळे कचरा वर्गीकरणाचा खर्च कमी होऊन एकप्रकारे महापालिकेचा महसूल वाचून नागरिकांच्या विविध करांतून मिळणारा निधी इतर नागरी सुविधांकरीता वापरता येईल, असे आयुक्तांनी सांगितले. शहराचे उद्याचे नागरिक असणार्या मुलांमध्ये स्वच्छतेची आवड रूजावी आणि त्यांना स्वच्छतेची सवय लागावी याकरीता क्लिनलीनेस सोल्जर नामक संकल्पना शाळाशाळांतून राबविली जात असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून कमीत कमी कचरा निर्माण करण्याकडे आणि योग्य ठिकाणीच कचरा टाकण्याची सवय लागून घेणे गरजेचे असल्याचेही मुंढे शेवटी म्हणाले.