नवी मुंबई : वाचन संस्कृती रुजविण्यासाठी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दि.15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे, असे अरुण गिते, विभागीय सहायक भाषा संचालक, विभागीय कार्यालय, नवीमुंबई यांनी सांगितले. आज भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, मुंबई व कोकण विभाग आणि राज्य सरकारी कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
गिते म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचनातून विचारांचे सिंचन होते. ग्रंथ हे आपले मित्र असतात. विचारांचे मौलिक मार्गदर्शन आपल्याला ग्रंथातूनच मिळते. ग्रंथांच्या सानिध्यात प्रत्येक व्यक्तीने राहीले पाहिजे. वाचकांना पुस्तके खरेदी करता यावीत या दृष्टीने ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राजेंद्र देशमुख, तसेच श्रीमती गायत्री प्र. नगराळे, श्रीमती मिना मि. गुरुसिद्धनवर, श्री. नरेंद्र हवालदार, प्र.का.भोईर, आदी भाषा संचालनालयातील कर्मचारी उपस्थित होते.