नवी मुंबई : “वॉक विथ कमिशनर” या उपक्रमाचा नागरिकांशी थेट संवाद साधून तेथील समस्यांची व अडचणींची प्रत्यक्ष माहिती मिळण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असून ज्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका नागरी सेवा सुविधा योग्य प्रकारे पुरवित आपले कर्तव्य पार पाडीत असते त्याचप्रमाणे नागरिकांनीही त्यांच्याकरीता पुरविण्यात आलेल्या सेवा सुविधांचा योग्य वापर करून शहर विकासात आपले योगदान देणे गरजेचे असल्याचे मत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरात आज ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांतर्गत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्तांनी सुसंवाद साधला.
यामध्ये प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधताना आयुक्तांनी पार्कींग विषयी जाणवणा-या अडचणींबाबत महानगरपालिका सम-विषम तारखांना पार्कींग, पार्कींग लॉट व्यवस्था अशा विविध प्रकारे पार्कींगचे धोरण लवकरच कार्यान्वित करीत असून नागरिकांनीही आपली वाहने सोसायटीच्या आवारातील पार्कींग लॉटमध्येच पार्क करावीत तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही अशाप्रकारे कुठेही पार्कींग करू नयेत अशा छोट्या छोट्या गोष्टींचे भान सुजाण नागरिक म्हणून ठेवण्याची गरज व्यक्त केली.
ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी 100 टक्के कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी वेगवेगळा करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. कचरा वर्गीकरणाच्या पुढे जात ओल्या कच-यावर सोसायटी पातळीवरच प्रक्रीया व्हावी यादृष्टीने पुढील काळात प्रयत्न केले जातील असे सांगत प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे हे देखील गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यत्त केले.
शहरात उपलब्ध असलेल्या पाण्याचे भविष्याचा विचार करून सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने ए.एम.आर.मीटर बसवून घेणे गरजेचे असल्याचे सांगत त्यामुळे वापरलेल्या पाण्याचे अचूक मोजमाप होईल व पाणी वापरावर आपोआप नियंत्रण येईल असे ते म्हणाले. पाण्याचे महत्व ओळखून नागरिकांनी गरजेपुरतेच पाणी वापरावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
वॉक विथ कमिशनर उपक्रमात प्राप्त निवेदनांमधील त्वरीत कार्यवाही करण्याच्या बाबींवर सात ते पंधरा दिवसात कार्यवाही करण्यात येईल व धोरणात्मक बाबींवर विचार करून त्याची आवश्यकता लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल असे सांगत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर विकासात नागरिकांचेही अनमोल योगदान गरजेचे असून सर्वांच्या एकत्रित सहयोगातून शहर विकासाला गती येईल असा विश्वास व्यक्त केला.