गर्भवती महिलांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल केले तीव्र आंदोलन.*
नवी मुंबई : ऐरोली येथील पालिका रुग्णालयात गर्भवती महिलांना नीट सोयी-सुविधा मिळत नसल्यामुळे तसेच पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून गर्भवती महिलांना रुग्णालयात भरती करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे आज दि.१४ ऑक्टोबर २०१६ रोजी ऐरोली मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली पालिका रुग्णालयात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिका रुग्णालयाचे वरिष्ठ निरीक्षक पोटे यांना जाब विचारण्यासाठी गेलेले मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले व मनसे पदाधिकारी यांना पोटे हे उपस्थितच नसल्याचे निदर्शनास आले. या गोष्टीचा निषेध म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे वरिष्ठ निरीक्षक पोटे यांची बसण्यासाठी असणारी दालनातील खुर्ची रुग्नालयाच्या प्रवेश द्वारावर नेऊन ठेवत जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले व चंद्रकांत सोनावणे यांना अटक केली. यावेळी मनसैनिकांनी रुग्णालय परिसर घोषणा देऊन दुमदुमून सोडला.
गेली कित्येक दिवसांपासून नवी मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांना भरती करण्यास पालिका रुग्णालये नाहक टाळाटाळ करीत आहेत. ऐरोली येथे गर्भवती महिलेला भरती करण्यास गेले तर तेथील कर्मचारी वाशी येथील पालिका रुग्णालयात जाण्यास सांगतात. तर वाशी येथील पालिका रुग्णालयात भरती करण्यास गेल्यास तेथील कर्मचारी जेजे रुग्णालय अथवा केइएम रुग्णालयात जाण्यास सांगतात. यामुळे अत्यंत नाजूक स्थितीत असणाऱ्या गर्भवती महिलांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ होतो.
दरवर्षी करदात्यांच्या पैश्यांतून करोडो रुपये या पालिका रुग्णालयांना अनुदान मिळते. मात्र करोडो रुपये खर्चून सुद्धा नवी मुंबई महापालिका आरोग्य प्रशासनाला जर मुलभूत सोयीसुविधा सर्वसामन्यांना देता येत नसतील तर या पालिका रुग्णालयांचा उपयोग काय असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. दरम्यान ही परिस्थिती अशीच राहिल्यास व येत्या १० दिवसांत जर गर्भवती महिलांच्या उपचाराचा प्रश्न मार्गी लागला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणखीन तीव्र आंदोलन नवी मुंबई महापालिका प्रशासनाविरोधात करण्यात येईल असा इशारा मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी दिला आहे.