संजय बोरकर
नवी मुंबई : उत्तराखंड राज्यामध्ये फलोत्पादन क्षेत्राच्या विकासात मोठया प्रमाणात वाव असून सफरचंद फळासोबत अन्य फळांच्या उत्पादनासाठी कृषि क्षेत्रात उत्तराखंडमध्ये विविध प्रयोग करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन उद्यान मंत्री (उत्तराखंड) प्रीतमसिंह पवार यांनी आज केले.
उत्तराखंड औद्योगिक बाजार परिषद आणि फलोत्पादन व अन्न प्रक्रिया विभाग, उत्तराखंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सफरचंद महोत्सव २०१६ चे उद्घाटन अर्बन हाट, सी.बी.डी, बेलापूर, नवी मुंबई येथे उद्यान मंत्री (उत्तराखंड) श्री.प्रीतमसिंह पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आ.मंदा म्हात्रे, आ.श्री.गणेश गोदियाल (उत्तराखंड राज्य),आर.सी.श्रीवास्तव, मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्तराखंड औद्योगिक बाजार परिषद, डॉ.बी.एस.नेगी, संचालक उद्यान उत्तराखंड, श्री.टीकम सिंह पंवार, सह सचिव, उद्यान, उत्तराखंड आदि मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले की, उत्तराखंडामध्ये ३४ हजार ६८५ हेक्टर जमिनीमध्ये सफरचंदाचे उत्पादन घेतले जात असून दरवर्षी १ लाख मे.टन सफरचंदाचे उत्पादन होते. उत्तराखंडामध्ये फलोत्पादन व पर्यटन क्षेत्रात विकास करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. कृषिवर आधारित विविध विकास योजना शासनाने तयार केल्या असून छोटया उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे. इको टुरिझम, हॉर्टी टुरीझमसाठी शासन प्रयत्नशील आहे. उत्तराखंडाच्या सफरचंदाची गुणवत्ता उत्कृष्ट असल्यामुळे प्रत्येक राज्यात हे सफरचंद पोहोचले पाहिजेत यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील प्रमुख शहरात अशा महोत्सवाचे उत्तराखंड शासनातर्फे आयोजन केले जाते. आपल्याला इतर राज्याची संस्कृती समजावी यासाठी या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रदर्शनात उत्तराखंड मधील उत्पादन केलेले विविध प्रजातीचे उत्कृष्ट आणि ताजे सफरचंद फळांसोबत अन्य औद्योगिक आणि कृषि उत्पादनांच्या जैविक डाळी, मध,मसाले, रेशम,सुगंधी द्रव्ये इत्यादी उत्पादने प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कार्यक्रमास नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.