- औरंगाबाद : पैसे लावून गोट्या खेळण्यामध्ये सुमारे तीन ते चार हजार रुपये झालेली उधारी फेडण्यासाठी दोन युवकांनी शुक्रवारी दुपारी मित्रनगर येथील निवृत्त शिक्षिकेच्या घरात घुसून मंगळसूत्र हिसकावण्याचे धाडस केले. गुन्हेशाखा पोलिसांनी दोन्ही तरुणांना घटनेनंतर अवघ्या २४ तासात अटक केली. आरोपीमध्ये एका अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे.
पंकज संत्रे (१८,रा. भानुदासनगर,जवाहर कॉलनी)असे मुख्य आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मित्रनगर येथील एका अपार्टमेंटमधील तिस-या मजल्यावर राहणा-या विद्या पाटील या निवृत्त शिक्षकेच्या घरात घुसून पंकज आणि त्याच्या १६वर्षीय मित्राने चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावून नेले होते.
घटनेनंतर आरोपी शांतपणे तेथून निघून गेले. घटनास्थळापासून काही अंतरावरील एका घरावर आणि हॉटेलवरील सीसीटिव्हीमध्ये हे दोन्ही तरुण कैद झाले होते. घटनास्थळी गुन्हेशाखा आणि जवाहरनगर पोलिसांनी भेट देऊन विचापूस केली. पोलिसांनी जवाहरगनर, भानुदासनगर परिसरातील संशयितांची विचारपूस सुरू केली. यावेळी त्यांना सीसीटिव्ही फुटेज दाखविण्यात आले.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसणारा तरुण भानुदासनगर येथे राहणा-या पंकज संत्रे असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पंकजला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यास गुन्हेशाखेत आणून त्याची चौकशी केली. यावेळी त्याने या घटनेशी आपला काहीच संबंध नाही,असा पवित्रा घेतला. तेव्हा त्यास आणखी विश्वासात घेण्यात आले. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. उधारी फेडण्यासाठी आपण मित्राच्या मदतीने ही लुट केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने विद्या पाटील यांचे लुटलेले पावणे दोन तोळ्याचे मिनीगंठण लपवून ठेवलेली जागा दाखविली. त्याच्या घरातून हे गंठण पोलिसांनी हस्तगत केले. त्याच्यासोबत असलेल्या १६ वर्षिय तरुणालाही लागलीच भानुदासनगरातून पोलिसांनी उचलले.
**
-
आरोपी बी.कॉम.चा तर दुसरा ९वीचा विद्यार्थी
पंकज संत्रे हा बदनापुर येथील एका महाविद्यालयात बी.कॉम. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी तर त्याचा मित्र शहरातील एका शाळेत नववीमध्ये शिकत आहे. दोन्ही आरोपींचे वडिल बांधकाम मिस्तरी म्हणून काम करतात. आरोपींचा हा पहिलाच गुन्हा असला तरी त्यांनी यापूर्वीही अशाप्रकारचे गुन्हे केले आहेत का या दृष्टीने पोलिसांनी त्यांची विचारपूस सुरू केल्याची माहिती पो.नि. सावंत यांनी दिली.
**
-
सीसीटिव्ही फुटेज आले पोलिसांच्या मदतीला
घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या एका घरावर आणि हॉटेलवर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या कॅमे-यांनी दोन्ही तरुणांना टिपले होते. हे फुटेज पोलिसांच्या मदतीला धावून आले. या फुटेजच्या आधारे गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक प्रशांत आवारे, अमित बागुल, कर्मचारी नितीन मोरे, विश्वास शिंदे, विलास वाघ, सुधाकर राठोड, सुनील पाटील,लालखा पठाण,धर्मराज गायकवाड, राम तांदळे हे आरोपीपर्यंत पोहचले.