कोस्टल रोडचे काम तातडीने हाती घ्यावे
सविता केमिकल येथे चार मार्गिकांचा उडडाणपूल बांधावा
आमदार संदीप नाईक यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाहतुककोंडी दूर करण्यासाठी शहरात अतिरिक्त रोप-वे मार्ग प्रस्तावित करावेत. कोस्टल रोडचे काम तातडीने हाती घ्यावे तसेच सविता केमिकल येथे उभारण्यात येणारा उडडाणपूल भविष्यातील वाहनांची वर्दळ लक्षात घेता चार मार्गिकांचा करावा, अशा दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या लेखी मागण्या आमदार संदिप नाईक यांनी मुख्यमंत्री तसेच एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांंच्याकडे केल्या आहेत.
वाशी ते ऐरोली, ऐरोली ते भांडूप आणि घनसोली ते कांजूरमार्ग रोप-वे ..
बोरिवली ते ठाणे, घाटकोपर ते वाशी, वाशी ते बेलापूर आणि नेरळ ते माथेरान असे रोप-वे मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेतल्याबददल आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. मात्र त्याचबरोबर उद्योग आणि व्यापाराची महत्वाची ठिकाणे असणार्या आणि लोकसंख्येत लक्षणीय वाढ झालेल्या नवी मुंबई शहरातही वाहतुककोंडी सोडविण्यासाठी रोप-वेचे अतिरिक्त मार्ग प्रस्तावित करावेत. त्या दृष्टीने सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना संबधितांना द्याव्यात, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, एम.आय.डी.सी., एपीएमसी, मिलेनियम बिझनेस पार्क, आय.टी.पार्क अशी अनेक उद्योग-व्यवसायाची मोठी केंद्रे नवी मुंबई परिसरात आहेत. नवी मुंबईची लोकसंख्या झपाटयाने वाढते आहे. तसेच वाहनांची संख्या देखील प्रत्येक वर्षी वाढते आहे. साहजिकच यामुळे वाहतुककोंडीची समस्या उदभवते. यामधून मार्ग काढण्यासाठी वाशी ते ऐरोली, ऐरोली ते भांडूप आणि घनसोली ते कांजूरमार्ग असे रोप-वे मार्ग तयार केल्यास नवी मुंबईतील नागरिकांना मुंबईत तसेच मुंबई उपनगरात आणि मुंबईच्या नागरिकांना नवी मुंबईत कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रवास करणे सुकर होईल, असा विश्वास आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना १० ऑक्टोबर २०१६ रोजी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.
वाशी ते बेलापूर कोस्टल रोड..
नवी मुंबई शहराचे झपाटयाने नागरिकरण होते आहे. लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येत कमालीची भर पडली आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र या मुळे वाहतुकीचा ताण आणखी वाढणार आहे. सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्ग असे तीन मार्ग सध्या शहरात वाहतुकीसाठी आहेत. मात्र दिवसेंदिवस वाढणार्या वाहनांच्या संख्येमुळे या मार्गांवर देखील वाहतुककोंडी होवू लागली आहे. या वाहतुककोंडीवर उपाययोजना म्हणून नवी मुंबई महापालिकेने वाशी ते एरोली आणि पामबीच मार्गाला समांतर असा वाशी ते बेलापूर असे दोन सागरी मार्ग एमएमआरडीएकडे प्रस्तावित केले आहेत. तसेच पर्यावरण विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. हे दोन्ही मार्ग खर्चिक असल्याने ते एकटयाने पूर्ण करणे पालिकेला आर्थिकदृष्टया झेपणारे नाही. पालिकेच्या प्रस्तावाला एमएमआरडीएने अनुकुलता दर्शविली असून पहिल्या टप्प्यातील वाशी ते ऐरोली सागरी मार्गाला एमएमआरडीएने अनुकुलता दर्शविली आहे. या मार्गासोबतच एमएमआरडीएने वाशी ते बेलापूर या सागरी मार्गाचे काम देखील हाती घ्यावे जेणेकरुन नवी मुंबई पालिका क्षेत्रातील संपूर्ण सागरी किनार्याचे काम पूर्ण होईल, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. या सागरी मार्गामुळे भविष्यात नवी मुंबईतील वाहतुकोंडीचा ताण कमी होणार आहे. निधीची कमतरता पडू न देता हे काम तातडीने हाती घेण्याच्या सुचना एमएमआरडीएच्या अधिकार्यांना द्याव्यात, अशी मागणी आमदार नाईक यांनी आपल्या पत्रात शेवटी केली आहे.
सविता केमिकल कंपनी येथे चार मार्गिकेचा उडडाणपूल..
ठाणे-बेलापूर मार्गावर सविता केमिकल कंपनी येथे एमएमआरडीमार्फत बांधण्यात येणार्या दोन मार्गिकेच्या उडडाणपूलामुळे येथील वाहतुककोंडीची समस्या मोठया प्रमाणावर दूर होणार असली तरी ठाणे-बेलापूर मार्गावर परतीच्या प्रवासात या ठिकाणची वाहतुककोंडी जैसे थे राहणार आहे. परतीच्या मार्गावरील वाहतुककोंडी दूर करण्यासाठी आणखी दोन मार्गिका बांधाव्यात, अशी मागणी आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना १० ऑक्टोबर २०१६ रोजी दिलेल्या पत्रात केली आहे. अतिरिक्त दोन मार्गिका बांधल्यास हा उडडाणपूल एकून चार मार्गिकेचा होईल. त्यामुळे जाण्यासाठी दोन मार्गिका आणि येण्यासाठी दोन मार्गिका अशा चार मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास येथील वाहतुकोंडीवर कायमचा तोडगा निघणार आहे, असे आमदार नाईक यांनी सांगितले.