श्रीकांत पिंगळे
आयुक्त मुंढेंच्या कार्याचा अतिक्रमण कर्त्यांनी घेतला धसका
सर्वच विभागांत अतिक्रमण विरोधी धडक मोहीमा
नवी मुंबई : पावसाळा संपल्यावर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नवी मुंबईचा बकालपणा हटविण्यासाठी आक्रमक होणार व अतिक्रमणे हटविणार ही नवी मुंबईकरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने खरी असल्याचे आपल्या कामातून दाखवून दिली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार रस्ते, पदपथ, मार्जिनल स्पेसेस नागरिकांकरीता मोकळ्या असाव्यात यादृष्टीने अतिक्रमणमुक्त ठेवण्याची कारवाई दैनंदिन स्वरूपात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. याबाबत महानगरपालिकेची कडक भूमिका लक्षात घेऊन मागील काही दिवसापासून यापुर्वी रस्ते, मार्जिनल स्पेसमध्ये टपर्या उभारून त्यात व्यवसाय करणारे व्यावसायिक हातगाड्यांवर वस्तुविक्री करताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे फेरीवाले चादरी व कपड्यात विक्री करावयाची भाजी/वस्तू ठेवून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या अनुषंगाने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या माध्यमातून संबंधित विभागांचे सहा. आयुक्त / विभाग अधिकारी यांच्यामार्फत अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक प्रभावीपणे राबवित सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रात कारवाई करण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून बेलापूर विभाग कार्यालयामार्फत विभाग अधिकारी सुभाष अडागळे यांच्या नियंत्रणाखाली सीबीडी बेलापूर मध्ये से.४ एफ टाईप, से.४ बनुबाई मार्केट, से.२३ सी वूड रेल्वे स्टेशन परिसर याठिकाणी कारवाई करून १५३ फेरीवाले हटविण्यात आले व त्यांचे सामान जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे से.४२ येथील ना फेरावीला क्षेत्रात बसणारे फेरीवालेही हटविण्यात आले आहेत. तसेच सुनिल गावस्कर मैदानासमोरील से. २ येथे विनापरवानगी उभारण्यात येत असलेला अनधिकृत मोबाईल टॉवर हटवून त्याचे सामान जप्त करण्यात आले आहे.
अशाचप्रकारे सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे विभाग कार्यालयामार्फत महानगरपालिकेच्या मलप्रक्रिया केंद्राच्या शेजारील भूखंडावर असलेल्या ६३ झोपड्या निष्कासीत करण्यात आल्या आहेत. से.१९ डी येथील व्यापा-यांनी मार्जिनल स्पेसमध्ये केलेले अतिक्रमणे हटवून त्यांच्याकडून २६ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
तसेच ऐरोली विभाग कार्यालयामार्फत सहा. आयुक्त चंद्रकांत तायडे यांच्या नियंत्रणाखाली श्रीम. गीता मिश्रा यांनी केलेले दोन मजली अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले आहे आणि से.१५ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन नजिकच्या अनधिकृत नर्सरीवर धडक कारवाई करून निष्कासीत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे से. १ येथील अनधिकृत मोबाईल टॉवर काढून टाकण्यात आला आहे.
कोपरखैरणे विभाग कार्यालय क्षेत्रात सहा. आयुक्त श्री. अशोक मढवी यांच्या नियंत्रणाखाली गुलाबसन्स डेअरी समोरील अनधिकृत फेरीवाले हटविण्यात आले असून सेक्टर १९, कोपरखैरणे येथील मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
त्यासोबतच डेब्रीज विरोधी बाबींवर विशेष लक्ष दिले जात असून डेब्रीज भरारी पथक व मुख्यालयातील पथकामार्फत कारवाई करीत गोठिवली तसेच घणसोली पामबीच मार्गाजवळ अशा कांदळवनाच्या दोन ठिकाणी दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत.
नवी मुंबईकर जनतेला अभिप्रेत असणारे स्वच्छ व सुंदर नवी मुंबई शहर घडविण्याकडे महापालिका आयु्क्त श्री. तुकाराम मुंढे यांचा कल असून त्यादृष्टीने चालण्यायोग्य मोकळे पदपथ, रहदारीसाठी खुले रस्ते तसेच नियमानुसार अतिक्रमण विरहीत नियोजनबध्द बांधकामे असावीत यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यादृष्टीने यापुढील काळात अतिक्रमण/अनधिकृत विरोधीतील मोहीमा अधिक प्रभावीपणे राबविल्या जाणार आहेत.