नवी मुंबई : ‘ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५’ ला परवानगी देत ‘मेट्रो ६’ चे विस्तारीकरण करत ती मीरा-भाईंदरपर्यंत नेण्यास मुख्यमंत्री व एमएमआरडीएच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार आणि विद्यमान प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी केलेल्या या विषयातील पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. डॉ.नाईक यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळापासून ते आजतागायत मेट्रोचा विस्तार मिरा-भाईंदरपर्यंत करावा, यासाठी प्रयत्न केले आहेत. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस.मदान यांना पत्र लिहून एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे रिंगरुट वाहतुक जाळे पूर्ण करणारा कासारवडवली-मिरा-भाईंदर-दहिसर या मेट्रो प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता द्यावी, अशी लेखी मागणी पुन्हा एकदा केली होती. मागणी मान्य केल्याबददल डॉ.नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मिरा-भाईंदरकरांच्या वतीने आभार मानले आहेत.
वडाळा ते कासारवडवली मेट्रो प्रकल्प ४चे काम लवकरात लवकर सुरु होणार आहे. त्याचबरोबर बांद्रा ते दहिसर मेट्रो प्रकल्पाचे काम देखील सुरु झालेले आहे. त्यामुळे कासारवडवलीपर्यंत येणारी मेट्रो पुढे तशीच घोडबंदर मार्गे मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रापर्यत नेण्यात यावी तसेच दहिसरपर्यंत येणारी मेट्रो देखील मिरा-भाईंदर पालिका क्षेत्रापर्यंत आणण्यात यावी, अशी लेखी मागणी डॉ. नाईक यांनी केली होती. ती आता मान्य झाली आहे. या विस्तारित मेट्रो प्रकल्पामुळे एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे रिंगरुट वाहतुकीचे जाळे पूर्ण होईल, आणि झपाटयाने विकसीत होणार्या मिरा-भाईंदर शहरांमधील नागरिकांना देखील मेट्रोची सेवा मिळेल, असे डॉ.नाईक यांनी सांगितले.