नवी मुंबई : लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणून हेकेखोर आणि हुकूमशाही पध्दतीने नवी मुंबई महापालिकेचा कारभार हाकणार्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अखेरीस भाजपा वगळता सत्ताधारी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’सह विरोधी पक्षातील शिवसेनेच्या सदस्यांनी अविश्वासाचा प्रस्ताव आणला आहे. त्याकरिता येत्या २५ ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन महापौर सुधाकर सोनवणे यांनी केले आहे. त्यामुळे गेले सहा महिने महापौर, आमदार आणि लोकप्रतिनिधी विरुध्द आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात सुरु असलेला वाद आता विकोपाला गेल्याचे दिसत आहे. तर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज असलेले महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिकेत पाय न ठेवण्याचा घेतलेला विडा येत्या २५ ऑक्टोबर रोजी संपुष्टात येणार असल्याचे बोलले जाते. परिणामी, गेले २० दिवस महापालिकेत पाय न ठेवणारे महापौर सुधाकर सोनावणे यांचे महापालिकेत इन तर आयुक्त तुकाराम मुंढे आऊट होणार असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरु आहे.
नियम आणि कायद्यावर बोट ठेवत आयुक्त मुढे यांनी लोकप्रतिनिधींविरोधात पुकारलेल्या असहकार्यामुळे गेले सहा महिने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधील वाद शिगेला पोहोचला. त्यामुळे विविध विकास कामांचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आले नाहीत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात केवळ ३७५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. गत सहा महिन्यांपासून आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधील संवाद कमी होऊ लागला होता. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकदाहा भेट घेतली नसल्यामुळे आणि प्रशासनातील अधिकारी दिलेल्या आदेशाचे पालन करीत नसल्याने महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका मुख्यालयात जाणे बंद केले. लोकशाहीचा गळा घोटला जाणार असेल आणि लोकांची कामे करता येणार नसतील तर फक्त खुर्चीवर बसण्यासाठी मुख्यालयात जाण्यात काय अर्थ? या महापौर सोनवणे यांच्या भूमिकेवर ते गेल्या २० दिवसांपासून ठाम राहिले.
अखेरीस महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराला कंटाळलेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली होती. त्याकरिता महापौर बंगल्यावर झालेल्या सर्वपक्षीय सदस्यांच्या बैठकीत आयुक्तांविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात येऊन तसा प्रस्ताव महापालिका सचिवांकडे पाठविण्यात आला. लगोलग महापालिका सचिवांनी देखील विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस प्रसिध्द करुन येत्या २५ ऑक्टोबर रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आल्याचे जाहिर केले.
नवी मुंबईचे महापौर आणि नगरसेवक यांचा अवमान करणे, जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी हेतुपुरस्सर रोष निर्माण करणे, त्यांना अपमानित करुन सुडबुध्दीने वागणूक देणे, सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या अधिकारावर गदा आणणे, धोरणात्मक विषय महासभेत न आणता आपल्या अधिकारात परस्पर अंमलबजावणी करणे, मुलभूत नागरी सुविधांबाबतची अकार्यक्षमता, हेकेखोर आणि मनमानी कार्यपध्दती, लोकशाही पध्दतीने काम न करता हुकूमशाही पध्दतीने काम करणे तसेच स्थायी समिती आणि महासभेला अपवाद वगळता हजर न राहणे आदि आरोप सदस्यांनी आयुक्त मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावात नमूद केले आहेत.
आयुक्तांच्या सदर कार्यपध्दतीतून त्यांची गैरवर्तणूक, बेजबाबदारपणा आणि कर्तव्यात हयगय केल्याचे दिसून येते. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३६(३) अन्वये अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी महापौरांनी प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सभागृहाच्या नियमावलीतील नियम १(ड) नुसार विशेष सभा बोलविण्याची मागणी विविध पक्षांच्या १४ नगरसेवकांनी केली आहे. सदर नगरसेवकांच्या विनंतीची दखल घेवून आपण तातडीने विशेष सभा बोलवल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितले.
सदर प्रस्तावावर स्वाक्षरी करणार्यांमध्ये स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, सभागृह नेते जयवंत सुतार यांच्यासह विनोद म्हात्रे, काशिनाथ पवार, जगदीश गवते, मिरा पाटील, प्रशांत पाटील, अशोक गुरखे, लक्ष्मीकांत पाटील, शुभांगी पाटील, भारती कोळी, छाया म्हात्रे, संगिता पाटील आणि मनोहर मढवी यांचा समावेश आहे.
दरम्यान, येत्या २५ ऑक्टोबर रोजी सदर अविश्वाच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा झडणार असल्याचे चित्र नवी मुंबईत दिसून येते. त्या दिवशी महापौरांचे महापालिकेत इनकमिंग होणार असले तरी आयुक्तांचे आऊटगोईंग होणार का? असा प्रश्न समस्त महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह तमाम नवी मुंबईकरांना पडला आहे.