श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : तुकाराम मुंढे आयुक्तपदी आल्यापासून त्यांनी केलेल्या धडाकेबाज कामामुळे अल्पावधीतच ते नवी मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. स्वच्छ व सुंदर नवी मुंबई तसेच फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुक्त नवी मुंबई ही आपली भूमिका तुकाराम मुंढेंनी कार्यातून दाखवून दिली आहे. राजकारण्यांना भिक न घालता धडाकेबाज कामे करणारे तुकाराम मुंढे आज सर्वसामान्य नवी मुंबईकरांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. त्यामुळेच राजकारण्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच नवी मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. भाजपा आमदारांनी मुंढेंबाबत मंत्रालयीन पातळीवर आपली भूमिका स्पष्ट केल्याने अविश्वास ठरावा भाजपा नगरसेवकांची भूमिका उत्सूकतेचा विषय ठरणार आहे.
आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यापासून लोकप्रतिनिधींना न जुमाननारे तुकाराम मुंढे यांनी महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासह आमदार मंदाताई म्हात्रे यांना देखील दिलेली वागणूक सापत्नपणाची होती. त्याचे पडसाद गत अधिवेशनात देखील उमटले होते. सत्ताधारी महिला आमदारांना आयुक्त सन्मान देत नसल्याबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह विरोधकांनी सत्ताधारी ‘सेना-भाजपा’ला भर सभागृहात जाब विचारला होता. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या कार्यपध्दतीमुळे नवी मुंबईत ‘भाजपा’चा जनाधार कमी होत चालला होता. मुख्यमंत्र्यांचा आशिर्वाद असल्यामुळे तुकाराम मुंढे यांना येथून कोणी हटवू शकत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे उद्योजक आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात दुखावला गेला होता व यातून हा मतदार भाजपापासून दुरावत चालल्याची चिंता भाजपाच्या छावणीत सातत्याने व्यक्त करण्यात येत होती.
सदर बाब मुख्यमंत्र्यांसह भाजपा श्रेष्ठींच्या आणि नेत्यांच्या निदर्शनास आणून देखील तुकाराम मुंढे यांचा उधळलेला वारु रोखला जात नसल्याने नवी मुंबईतील जनता ‘भाजपा’वर नाराज झाली होती. याच गोष्टीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न ‘भाजपा’च्या विरोधकांकडून सुरु होता. परिणामी, भाजपा सदस्यांची परिस्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. त्यामुळेच राज्यातील सत्ताधारी पक्षाचे सदस्य असल्यामुळे भाजपा नगरसेवकांना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वासाच्या ठरावावर मतदान करण्याचे धाडस होत होत नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रस्तावावर मतदानाप्रसंगी ‘भाजपा’चे नगरसेवक तटस्थ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.