श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : सिडको प्रशासनाने दिवाळीपूर्वीच आठ दिवस अगोदर कामगारांच्या बॅक खात्यामध्ये तब्बल ३१ हजार रूपये सानुग्रह अनुदान जमा केले आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सिडकोचा आदर्श घेत लवकरात लवकर दिवाळीपूर्वी कामगारांच्या बँक खात्यामध्ये सानुग्रह अनुदान जमा करण्याची मागणी कामगार नेते व इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे.
गतवर्षी सिडकोने कामगारांना दिवाळीच्या पार्श्वभूमी २७ हजार रूपये सानुग्रह अनुदान दिले होते. यंदा मात्र त्यात तब्बल ४ हजार रूपयांनी वाढ करत ३१ हजार रूपये सानुग्रह अनुदान कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमादेखील केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. महापालिकेत काम करणार्या कायम व कंत्राटी कर्मचारी-अधिकार्यांच्या परिश्रमामुळे महापालिका प्रशासनाला केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पुरस्कारही मिळत आहे. दिवाळी आता आठवड्यावर आली असल्याने महासभेत कंत्राटी व कायम कामगारांच्या सानुग्रह अनुदानाबाबत तातडीने निर्णय घेवून लवकरात लवकर त्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
सध्याची वाढती महागाई आणि महापालिकेची सधन आर्थिक क्षमता पाहून कायम कर्मचारी व अधिकार्यांना २५ हजार रूपये सानुग्रह अनुदान, ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी कामगारांना १५ हजार रूपये सानुग्रह अनुदान तसेच एनएमएमटीवर रोजदांरीवर काम करणार्यांनाही १२ ते १५ हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय महासभेत लवकरात लवकर घेण्यात यावा. दिवाळी आता तोंडावर आली असल्याने प्रशासन व नगरसेवक यांच्यातील वाद बाजूला ठेवून लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.