शिवसेना नगरसेविका सुनिता रतन मांडवेंचे आयुक्तांना साकडे
श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांकरता नेरूळ नोडमध्ये आधार कार्ड केंद्र सुरू केले नसल्याने नेरूळमधील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता तातडीने नेरूळ नोडमध्ये आधार कार्ड केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या प्रभाग ८७ मधील नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईत ठिकठिकाणी ० ते १८ वयोगटातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता आधार कार्ड केंद्र सुरू केली आहेत. तथापि नेरूळ नोडमध्ये महापालिकेने एकही आधार कार्ड केंद्र सुरू केले नसल्याची नाराजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
नेरूळमध्ये शालेय, महाविद्यालय तसेच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय कॉलेज मोठ्या प्रमाणात असून विद्यार्थ्यांची आधार कार्ड अभावी गैरसोय होवू नये म्हणून पालिका प्रशासनाने तातडीने नेरूळ नोडमध्ये आधार कार्ड केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेविका मांडवे यांनी केली आहे.