संजय बोरकर : 9869966614
*नवी महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यांपासून वंचित*
नवी मुंबई : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सहा महिन्यानंतरही नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सुमारे 40,000 विद्यार्थी शैक्षणिक साहित्यांपासून वंचित आहेत. शैक्षणिक शहर , 21 व्या शतकातील शहर अशी अनेक बिरुदावली मिरवणार्या नवी मुंबई चे शैक्षणिक भवितव्य हेच आहे का ? असा संतप्त सवाल करत मनविसेचे नवी मुंबई अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी येत्या 10 दिवसांत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप न झाल्यास निषेध म्हणून मनविसे तर्फे नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व लोकप्रतिनिधी,नगरसेवक, सर्व संबंधित अधिकारी यांना बेशरमीची झाडे स्वरूपात पाठविण्यात येतील असा इशारा दिला आहे.
नवी मुंबईतील काँवेंट शाळांमधील महागडे शिक्षणापेक्षा महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन आपली बौद्धिक आणि शैक्षणिक क्षमतेचा विकास करू पाहणार्या नवी मुंबईतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना कोणी वाली उरला आहे का ? शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सहा महिने उलटून गेल्यानंतरही या नवी मुंबई महानगरपालिकेच्या 40000 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यापासून वंचित ठेवणार्या इथल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाला लाजा वाटत नाहीत का ? असा संतप्त सवाल मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी उपस्थित केला
मानापमानाच्या नाट्यात मग्न असलेल्या या नगरसेवक , लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन यांचा धिक्कार करत नवी मुंबईतील बहुतांशी गरीब व मोलमजुरी करणार्या गरीब कुटूंबातील हे विद्यार्थी आर्थिक दुर्बलतेवर मात करून आपल्या पालकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालीकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, सध्याच्या स्पर्धेच्या युगात या शाळांमधील विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मेहनत घेत आहेत त्यांच्यामधे आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी नमुमपा शाळांतील शिक्षक देखिल मेहनत घेत आहेत व शिक्षणाचा दर्जा उंचावत आहेत. हे सर्व घडत असताना टेंडरच्या निमित्ताने असो, शिक्षण मंडळाच्या अधिकार्यांच्या कुरघोडीमुळे असो, नगरसेवक,लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे असो किंवा लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा यामुळे असो, शाळा सुरू होऊन सहा महिन्यानंतरही पालिकेच्या विध्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप न होणे ही अत्यंत शरमेची आणि नवी मुंबईला काळिमा फासणारी बाब असल्याचे सांगत मनविसे नवी मुंबई अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संपूर्ण पावसाळा या गरीब विद्यार्थ्यांनी विना रेनकोट घालवल्यानंतर शहरातील विविध कंत्राटांवर करोडो खर्च करणारी नवी मुंबई महानगरपालिका या 40,000 गरीब विद्यार्थ्यांचा विचार करणार आहे का ? असा सवाल मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी उपस्थित करत या अनागोंदी कारभाराचा मनविसेच्या वतीने सविनय म्हात्रे यांनी निषेध व्यक्त केला आहे.