संजय बोरकर
सभापती मोहन म्हात्रेंनी घेतल्या समस्या जाणून
सभापती मोहन म्हात्रेंचे समस्या सोेडविण्याचे आश्वासन
शौचालय, इमारत व आसनव्यवस्था मोजतेय अखेरची घटका
नवी मुंबईः नवी मुंबई महापालिका परिवहन समिती सभापती मोहन म्हात्रे यांनी ‘एनएमएमटी’च्या आसुडगाव आगारात नुकतीच संबंधित परिवहन अधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक घेऊन आगारातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील आसुडगाव आगाराची दुरवस्था झाली असून, शौचालय, इमारत आणि आसनव्यवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून खराब झाली आहे. महापालिका परिवहन समिती सभापती मोहन म्हात्रे यांनी तातडीने संबंधित अधिकारी-कर्मचारी आणि परिवहन समिती सदस्य यांची बैठक आसुडगाव आगारात आयोजित करुन आगारातील समस्यांची माहिती घेतली.
महापालिका परिवहन उपक्रमातील आसुडगाव आगाराचा गेल्या २० वर्षात कोणत्याही महापालिका परिवहन समिती सभापतींनी पाहणी दौरा केला नाही, आगारातील कामगारांच्या समस्या आणि गरजा जाणून घेतल्या नाहीत. परंतु, नुकत्याच झालेल्या बैठकीत परिवहन समिती सदस्यांनी सर्वानुमते आसुडगाव आगारातील शौचालय, इमारत आणि आसनव्यवस्था दुरुस्तीचे आदेश दिले असून, काही किरकोळ दुरुस्ती करून महापालिका आयुक्तांच्या अखत्यारीत असणारे प्रश्न महासभेत मांडण्यात येणार आहेत, असे महापालिका परिवहन समिती सभापती मोहन म्हात्रे यांनी सांगितले.
आसुडगाव आगारात शौचालय, आगाराची इमारत, वाहन दुरुस्तीसाठी असणारे शेड, बसण्याची आसनव्यवस्था यांची दुरवस्था झाली होती. त्यापैकी शौचालय आणि वाहन दुरुस्ती केंद्र व्यवस्थित करण्यास सांगितले असून, आगारातील सर्व समस्या लवकरच दूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक शिरीष आदरवाड यांनी दिली.