श्रीकांत पिंगळे
राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे नगरसेवक विशाल डोळस यांना अटक
नवी मुंबई : गोरगरीबांना तात्काळ व स्वस्त दरात तेही दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये प्रसिध्द असणार्या डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालयातील डॉक्टरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नगरसेवक विशाल डोळस यांनी मारहाण केल्याने नवी मुंबईकरांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. लोकनेते गणेशजी नाईक, तुमच्या नगरसेवकांना आवरा, असा सूर आता नवी मुंबईकरांकडून आळविला जावू लागला आहे. डी.डी.कोलते, डॉ. मोरे यांच्यासह अन्य मंडळी दिवसाउजेडी तसेच रात्री-अपरात्री तात्काळ उपलब्ध होत असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकाकडूनच मारहाणीचे कृत्य घडल्याने रूग्णालय परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’चे सीवूड भागातील नगरसेवक विशाल डोळस यांना नेरुळ पोलिसांनी शुक्रवारी (दि. २१ ऑक्टोबर) रोजी अटक केली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
गत १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सीवुडस् भागात राहणारे आर.एस.मिश्रा (५२) छातीत दुखत असल्याने नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे सदर रुग्णालयात आपत्कालीन विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी मिश्रा यांच्या तत्काळ तपासण्या करुन त्यांच्यावर कोणते उपचार करणे आवश्यक आहे, याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्याचप्रमाणे मिश्रा यांच्यावरील उपचारासाठी लागणार्या खर्चाची माहिती देतानाच त्यांच्यावर तत्काळ उपचार करणे आवश्यक असल्याचेही निदर्शनास आणून दिले. परंतु, मिश्रा यांच्या नातेवाइकांनी त्यांना घरी घेवून जात असल्याचे तेथील डॉक्टरांना सांगितले. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी मिश्रा यांच्या जीवितास धोकाअसल्याचे निदर्शनास आणून देतानाच मिश्रा यांना त्यांच्या जबाबदारीवर घरी घेवून जाण्याबाबत सुचविले. त्यानुसार मिश्रा यांच्या नातेवाईकांनी स्वत:च्या जबाबदारीवर त्यांना घरी घेऊन जात असल्याचे लेखी पत्र देऊन त्यांना रात्री घरी नेले. परंतु, २० ऑक्टोबर रोजी सकाळी मिश्रा यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना सकाळी पुन्हा डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मिश्रा यांचा मृत्यू झाल्यानंतर याबाबत जाब विचारण्यासाठी ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक विशाल डोळस रुग्णालयात गेले होते. यावेळी विशाल डोळस यांनी येथील व्यवस्थापक डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांना अपशब्द वापरले. तसेच कर्तव्यावर असलेले डॉ. मन्नू मॅथ्यू यांना मारहाण केली.
डॉक्टरांनी झालेला सर्व प्रकार समजावून सांगितल्यानंतरही डोळस यांनी त्यांचे काही एक ऐकून न घेता तेथील डॉक्टरांना शिवीगाळ करुन मारहाण केली. सदर घटनेनंतर डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्यांनी या मारहाणीचा निषेध करुन नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरुन नेरुळ पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी नगरसेवक विशाल डोळस यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. अखेर २१ ऑक्टोबर रोजी दुपारी पोलिसांनी नगरसेवक विशाल डोळस यांना अटक करुन सीबीडी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने विशाल डोळस यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
चौकट
नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये सर्वसामान्य गरीब रुग्णांना
सवलतीच्या दरात उपचार मिळत असल्याने तसेच २० हजार रुपयांपर्यंतच्या शस्रक्रिया या रुग्णालयात मिळत असल्याने फक्त नवी मुंबईतीलच नव्हे तर मुंबईतील मानखुर्द गोवंडी, मुंब्रा, ठाणे, दिवा, उरण, पनवेल, डोंबिवली आदि ठिकाणचे गरीब आणि गरजु रुग्ण सदर ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णालायत अनेक रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. यामुळे नवी मुंबईमधील आमदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडे आलेल्या
रुग्णांना डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये पाठवत असतात. अशा प्रकारे गरीब आणि गरजु रुग्णांसाठी मदत करणार्या या रुग्णालयातील डॉक्टरांना ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवकाने मारहाण केल्याने त्याच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नेरुळ मधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये सर्वसामान्य गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळत असल्याने तसेच २० हजार रुपयांपर्यंतच्या शस्रक्रिया या रुग्णालयात मिळत असल्याने फक्त नवी मुंबईतीलच नव्हे तर मुंबईतील मानखुर्द गोवंडी, मुंब्रा, ठाणे, दिवा, उरण, पनवेल, डोंबिवली आदि ठिकाणचे गरीब आणि गरजु रुग्ण सदर ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णालायत अनेक रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातात. यामुळे नवी मुंबईमधील आमदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये पाठवत असतात. अशा प्रकारे गरीब आणि गरजु रुग्णांसाठी मदत करणार्या या रुग्णालयातील डॉक्टरांना ‘राष्ट्रवादी’चे नगरसेवकाने मारहाण केल्याने त्याच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.