श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : शहराच्या विकासात महानगरपालिकेप्रमाणेच नागरिकांचेही योगदान महत्वाचे असून स्वच्छता, कच-याचे तयार होतो त्या ठिकाणापासूनच ओला – सुका वर्गीकरण, पाण्याचे नियोजन व त्यासाठी एएमआर मिटर्सची आवश्यकता अशा नागरी सुविधांविषयक विविध बाबींमध्ये महानगरपालिकेप्रमाणेच नागरिकांचीही जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित सहभागातूनच शहराचा सर्वांगीण व योग्य प्रकारे विकास होईल असे सांगत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्यासाठी व आपल्या भावी पिढीसाठी चांगले शहर निर्माण करणे ही आपली सामुहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. से.13, सानपाडा येथील मोराज रेसिडन्सी समोरील उद्यानात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांतर्गत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.
नागरिकांना थेट भेटणारे व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना करणारे आपण पहिले आयुक्त आहात व आपण आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यापासून शहर विकासाला अतिशय गती लाभल्याचे मत व्यक्त करीत यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले.
यावेळी ब-याच नागरिकांकडून मुख्यत्वे पार्कींगची समस्या मांडण्यात आली. यावर बोलताना आयुक्तांनी महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण महापालिका क्षेत्राचा आढावा घेऊन वन साईड पार्कींग, वन वे वाहतुक, नो पार्कींग झोन अशा विविध प्रकारे पार्कींगचे नियोजन करून लवकरच याचे धोरण अंमलात आणले जात असल्याचे सांगितले. हे करताना नागरिकांनीही आपल्या सोसायटीच्या आवारातच पार्कींग करावे, नो पार्कींग झोन मध्ये गाडी उभी करू नये अशा नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
याशिवाय स्वच्छता, पदपथ, अतिक्रमणे अशा लगेचच करावयाच्या बाबींवर त्वरीत 7 ते 15 दिवसात कार्यवाही करण्यात येईल व तसे नागरिकांना कळविण्यात येईल तसेच धोरणात्मक बाबींवर पाहणी व विचार करून कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. येथील मार्केट आणि उद्यानाची अडचण काही कालावधीतच दूर होईल त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.
महानगरपालिकेच्या नागरी सुविधांविषयी येणा-या अडचणी, तक्रारी महानगरपालिकेपर्यंत पोहचविण्यासाठीऑनलाईन ‘तक्रार निवारण प्रणाली’ (public grievance system) अद्ययावत स्वरूपात विकसित करण्यात आली असून आपली तक्रार नोंदविण्यासाठी आता महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, तर नागरिक घरबसल्या एका क्लिकवर महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर अगदी सहजगत्या आपली तक्रार नोंदवू शकतात अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
याठिकाणी तक्रार नोंदविल्यानंतर एक यूनिक आय डी नंबर नागरिकांना मिळेल व तसा एसएमएस ही नागरिकांच्या मोबाईलवर जाईल असे सांगत विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या कोणत्या विभागाशी तक्रार संबंधित आहे हे नागरिकांना ठाऊक नसले तरी या प्रणालीतील खास यंत्रणेव्दारे ती तक्रार संबंधित विभागाकडे पाठविली जाईल असे त्यांनी सांगितले. याशिवाय नागरिक त्यातील ट्रॅकींग सिस्टीमव्दारे आपण दाखल केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले याची माहिती घेऊ शकतात, तक्रारीविषयी केलेल्या कार्यवाहीचे गुणांकन करू शकतात, याशिवाय कार्यवाहीवर समाधान झाले नाही तर पुन्हा तक्रार दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे अशी माहिती त्यांनी दिली.
याठिकाणी दाखल झालेल्या तक्रारींवर कार्यवाहीसाठी प्रत्येक अधिका-यांना ठराविक कालमर्यादा निश्चित करून देण्यात आलेली असून संबंधित अधिका-यांकडून तक्रारीची दखल घेण्यात आली नाही तर त्यांच्या वरिष्ठांकडे ती तक्रार वर्ग होते अशी सुविधा त्या प्रणालीत आहे. याशिवाय जन्म दाखला, मृत्यू दाखल्यापासून बांधकाम परवाना, जाहिरात परवाना अशा आवश्यक 21 प्रकारचे परवाने, परवानग्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची सुविधाही वेबसाईटव्दारे देण्यात आली असून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले.
भावी पिढीला शाश्वत पर्यावरण उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असून नागरिकांनी शहर विकासात आपले संपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले, यावर नागरिकांनी आपल्याला आमचा संपूर्ण सहयोग राहील अशी भावना व्यक्त केली.