नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यक्षम आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात महापालिकेतील नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. हे होणारच होते. चांगल्या माणसाला काम करताना अडथळे येतातच. त्याचा चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू करण्याचा प्रकार हा नेहमीच होतो. तुकाराम मुंढेंच्या बाबतीत सध्या राजकीय क्षेत्रातील मंडळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मिडीयावर अपप्रचार करत आहेत, तो सर्व हास्यास्पद असल्याचे लगेचच निदर्शनास येते. तुकाराम मुंढे यांच्याकडे आज पाहिल्यावर ‘नायक’ या सिनेमातील ‘एक दिन का सीएम’ बनलेल्या अनिल कपूरची आठवण येते. अनिल कपूरला जो त्रास अमरिश पुरी व त्यांच्या सहकार्यांनी सिनेमात दिला होता. तोच त्रास देण्याचा प्रकार सध्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत सुरू झाला आहे. फरक इतकाच नवी मुंबईतील राजकारणातील अमरिश पुरी आजही पडद्याआड राहून आपल्या हालचाली करत आहे. दिवाळी आली आहे. दिवाळी काजू-कतरी व मिठाईचे वाटप होतच असते. तुकाराम मुंढे प्रकरणातही हा अमरिश पुरी सर्वपक्षीय नगरसेवकांना, विरोधी पक्षाच्या पदाधिकार्यांना अगदी नवी मुंबई बाहेरील नामदारांनाही काजू कतरी व मिठाईचे वाटप करण्याच्या तयारीत आहे. तुकाराम मुंढेरूपी नायकाला आयुक्तपदावरून हटविण्यासाठी थोडीथोडकी लाखोंची नव्हे तर करोडो रूपयांची सुपारी दिली गेली असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आयुक्त तुकाराम मुंढेची राजकीय सुपारी देण्यामागे व त्यांना आयुक्त पदावरून हटविण्यासाठी राजकारणातील महारथी, नवी मुंबई महापालिकेतील माजी प्रशासकीय अधिकारी, माजी उपायुक्त, शिक्षण सम्राट, प्रख्यात बांधकाम व्यावसायिक एकत्र आले आहेत. तथापि हा अविश्वास ठराव संमत झाला तरी हा फुसका बारच ठरणार आहे. तुकाराम मुंढे अजून किमान वर्षभर तरी हटणार नसल्याचे मंत्रालयीन पातळीवरील संकेत आहेत.
तुकाराम मुंढे यांची नवी मुंबईतील वाटचाल ‘तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले’ याच स्वरूपाची आहे. मुळातच अन्य आयुक्तांना आजवर जे जमले नाही, त्यांच्यामध्ये करायची इच्छाशक्ती नव्हती, भ्रष्टाचारी राजकारण्यांना अंगावर घेण्याची धमक नव्हती. फेरीवाल्यांना हटवून स्वच्छ नवी मुंबई करणे ज्यांना जमले नाही, अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविता आला नाही. भ्रष्ट राजकारण्यांच्या पुढे छाती काढून चालणे व डोळ्याला डोळा भिडविणे ज्यांना कधी जमले नाही, ती सर्व कामे आज तुकाराम मुंढे यांनी करून दाखविली आहे. राजकारणी मंडळी जरी तुकाराम मुंढेंच्या विरोधात गेली असली तरी ती त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तुकाराम मुंढेंच्या विरोधात गेली आहेत. नवी मुंबईकर मात्र आजही तुकाराम मुंढेंच्या सोबत आहेत. त्यांना आयुक्तपदी तुकाराम मुंढेंच हवे आहेत. नवी मुंबईकरांचा तुकाराम मुंढेंना असलेला पाठिंबा व त्यांनी नवी मुंबईकरांची जिंकलेली मने पाहता खर्या अर्थांने राजकारण्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. राजकारण्यांची पाचावर धारण बसलेली आहे. ‘वॉक विथ कमिशनर’ हे अभियान तुकाराम मुंढे राबवित असल्याने महापालिका स्थापनेनंतर तब्बल 25 वर्षानंतर आयुक्तांचा थेट नवी मुंबईकरांशी समोरासमोर संवाद होत आहे.
अतिक्रमण मुक्त नवी मुंबई, स्वच्छ व सुंदर नवी मुंबई ही संकल्पना तुकाराम मुंढे राबवित असल्याने आजवर उखळ पांढरे झालेल्या राजकारण्यांची आवक अचानक मंदावली आहे. अतिक्रमणामुळे अनेकांच्या नगरसेवक पदावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. महाराष्ट्रातल्या दोघा महारथी राजकारण्यांच्या नेरूळमधल्या दोन शैक्षणिक साम्राज्यावर मुंढेंचा हातोडा कोणत्याही पडण्याची शक्यता असल्याने मुंढे हटाव मोहीम गतीमान झालेली आहे. मुंढे हटाव मोहीमेत नेरूळमधील मातब्बर राजकीय शिक्षण सम्राटांसोबत पामबीच मार्गावर टॉवर उभारणार्या बिल्डरांनी आक्रमक होत स्वारस्य दाखविले आहे. काजू कतरी व मिठाईचे वाटप करण्याकरता आपल्या तिजोरीतील कितीही लक्ष्मी खर्च करण्याची तयारी या बिल्डरांनी दाखविली आहे. शिक्षणसम्राटांच्या शैक्षणिक संकुलावर हातोडा पडू नये तसेच एका शिक्षण सम्राटाच्या शिक्षण संकुलात 24 मजली टॉवरचे काम सुरू आहे. या बांधकामाला साधी सीसी (बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र) घेण्याचेही सौजन्य या शिक्षणसम्राटांने दाखविलेले नाही. आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, ही नेरूळमधील शिक्षणसम्राटांची मुजोरी यातून स्पष्ट होत आहे. पण या मुजोरीला छेद देत चुकीच्या गोष्टींना खतपाणी न घालण्याचा मुंढे यांनी निर्णय घेतला.
मुंढेप्रकरणामध्ये नवी मुंबईत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्टपणे पडद्याआड झालेली युती नवी मुंबईकरांना पहावयास मिळालेली आहे. पारसिक हिलवर एरव्ही माणसांची प्रतिक्षा करणार्या महापौर बंगल्यावर वर्दळ वाढू लागली आहे. विधानसभा निवडणूकीत टक्केवारीचे आरोप प्रचारादरम्यान करणारा एक राजकीय महाभाग बोनकाडेतील बालाजीश्वरांना कसा शरण आला आहे, याचीही खमंग चर्चा राजकारणात सुरू झाली आहे. मुढे हटाव मोहीमेमुळे शिवसेनेत स्पष्टपणे दोन गट पडले आहे. एरोलीतील शिवसेनेच्या रथी-महारथी नगरसेवकांचे मुंढे यांना स्पष्टपणे समर्थन आहे. परंतु नवी मुंबई शिवसेनेच्या धुरा वाहणार्या ठाणेकरांच्या दबावाला नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांना शरण जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय राहीलेला नाही. काँग्र्रेसमधील एका नेतृत्वाबद्दलही राजकीय वर्तुळात संशय व्यक्त केला जावू लागला असून काजू कतरी व मिठाईची पाकिटे बोनाकोडेच्या बालाजीतून हा काँग्रेसचा नेता चार दिवसापूर्वीच घेवून आल्याचे राजकारणातील ‘पंटर’ मंडळींकडून छातीठोकपणे सांगण्यात येत आहे. सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या व विशेषत: बालाजीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारा हा काँग्रेसी नेता काजू कतरी व मिठाईच्या प्रभावाखालीच सध्या बालाजीश्वरांना शरण गेला आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे खर्या अर्थांने नवी मुंबईकरांसाठी ‘नायक’ बनले आहेत. त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी राजकारणातील रथी-महारथी, बिल्डर मंडळी, शिक्षण सम्राट एकत्र आली आहे. काजू कतरी व मिठाई देण्यासाठी तिजोरीतील करोडो रूपये खर्च करण्याची संबंधितांची तयारी आहे. मुंढे यांना हटविण्याकरता जी मंडळी आक्रमक झाली आहेत, त्यांना नवी मुंबईशी अथवा नवी मुंबईकरांच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना आपले अस्तित्व टिकवायचे आहे. आपले आर्थिक समीकरण बिघडू द्यायचे नाही. चार दिवसापासून सोशल मिडीयावर मुंढे हटावची सुपारी दिलेल्या मंडळींची पंटर कंपनी सोशल मिडीयावर मुंढे यांच्याविरोधात गरळ ओकून नवी मुंबईकरांची दिशाभूल करू लागली आहे. सुज्ञ नवी मुंबईकरांना हा सर्व प्रकार समजून, उमजून चुकला आहे. नवी मुंबईकरांचे मुंढे यांना समर्थन आहे. मुंढे यांचे नाव घराघरात पोहोचलेे आहे. मुंढे यांच्याविरोधात निर्माण झालेले हे षडयंत्र हे खर्या अर्थांने मुंढे यांच्या कार्याची पोचपावती आहे. अशी माणसे प्रशासनामध्ये टिकली पाहिजेत.
संदीप खांडगेपाटील
साभार : दै. जनशक्ति
दै. जनशक्तिमधील दि. 24 ऑक्टोबरच्या अंकातील हा लेख नवी मुंबईतील घडामोडींवर प्रकाशझोत टाकणारा आहे.