भ्रष्टाचार मुक्त मनपासाठी नवी मुंबईला आयुक्त मुंडेंची गरज, मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नवी मुंबई : नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त, माथाडींच्या आणि अल्प उत्पन्न गटांच्या (LIG) गरजेपोटी घरांच्या प्रश्नांबाबत मनपा आयुक्ताने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी नेहमीच मनसेची भूमिका राहिली आहे. मात्र या आडून आयुक्त तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक कर्तव्यदक्ष व कार्यक्षम आयुक्ताला आपल्या राजकीय व आर्थिक फायद्यासाठी हटविण्याचा डाव नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष व आजी माजी पालकमंत्री करीत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा कडाडून विरोध करेल व वेळ पडल्यास मुंडेंच्या समर्थनार्थ जेल भरो करू असा इशारा मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र पाठवले असून मनपातील भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी नवी मुंबईला मुंडेंची गरज असल्याचे मत गजानन काळे यांनी व्यक्त केले आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे नवी मुंबईतील पदपथ मोकळे झालेत, कामचुकार मनपा अधिकाऱ्यांना वचक बसला आहे, अनेक अनधिकृत बांधकामांना आळा बसला आहे. मनपाचा कारभार बऱ्याच अंशी पारदर्शी झाला आहे. मनपाच्या तिजोरीत १ हजार कोटींची भर पडली आहे. तर प्रकाश कुलकर्णी, पत्तीवार, परोपकारी सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. २०/२५ वर्षांत येथे आलेल्या भल्या-भल्या आयुक्तांना आणि इथल्या नगरसेवकांना व सत्ताधाऱ्यांना जमले नाही असे सुशासन आपल्या 6 महिन्यांच्या कालावधीत आयुक्त मुंडे यांनी आणले आहे. याबद्दल मनसे त्यांचे अभिनंदन करत आहे. बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन निवडून आलेले व अनधिकृत बांधकामांमुळे अडचणीत आलेल्यासेना,कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या बऱ्याच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आल्यामुळे मुंडे हटावचा नारा या अभद्र युतीने दिला असल्याचा आरोप मनसेने केला आहे. निवडणुका आणि अनेक विषयांत एकमेकांना पाण्यात पाहणारे मुंडे हटावसाठी एकत्र कसे असा सवाल मनसेचे सविनय म्हात्रे यांनी विचारला आहे. अविश्वास ठराव काहीही येवो मात्र मुख्यमंत्र्यांनी मुंडेंच्या पाठीशी उभे रहावे व त्यांना त्यांचा कालवधी पूर्ण करू द्यावा अन्यथा मनसे रस्त्यावर येऊन “जेल भरो करेल” असे गजानन काळे यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या भावना मुंडेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांनी या राजकीय दबावाला न घाबरता आपले काम करावे असे मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडेयांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.