मनपाच्या उदासिनतेने जंगली गवताच्या विळख्यात अडकले क्रिडांगण
नवी मुंबई : नेरूळ नोडमध्ये पामबीच मार्गालगत असलेला सेक्टर चार हा परिसर उच्चभ्रूंचा परिसर म्हणून ओळखला जातो. नेरूळ सेक्टर सहा व चारमध्ये फक्त एका रस्त्यामुळे विभाजन झाले आहे. तथापि नेरूळ सेक्टर सहामध्ये असलेल्या सिडकोच्या सदनिका ऐशी लाखापर्यत विकल्या जात असताना रस्त्याच्या पलिकडील बाजूला असलेल्या सिडकोच्या सदनिका सव्वा कोटीपर्यत विकल्या जात आहेत. सेक्टर चार परिसरात पालिकेच्या असलेल्या क्रिडांगणातील ६० टक्क्याहून अधिक भागावर जंगली गवत वाढले असून या परिसरात खेळाडूंना, मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध राहीलेली नाही. मालमत्ता कर गोळा करणार्या महापालिकेला या क्रिडांगणाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
नेरूळ सेक्टर ४ परिसरात दोन्ही बाजूला खाडी परिसर असल्याने बाराही महिने येथील रहीवाशांना थंडावा प्राप्त होत असतो. या परिसरातील नागरिकांकडे गर्भश्रीमंती असतानाही पालिका प्रशासनाकडून नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. वाधवाच्या टॉवरमुळे या परिसराला शोभा आली असली तरी याच वाधवा इमारतीला पाणी पुरवठा करणार्या टॅकरने परिसरातील रस्त्यापैकी अर्धा रस्ता व्यापलेल्या उर्वरित अर्ध्या रस्त्यातूनच येथील रहीवाशांना आपली वाहने घेवून जावी लागतात. वाधवा टॉवर ते स्मशानभूमी रोडवर वनविभागाचे खारफुटी रक्षणसाठी फलक लावलेले असतानाही दिवसाढवळ्या तेथे आजही मोठ्या प्रमाणावर ट्रकमधून डेब्रिज तसेच रॅबिट टाकले जात आहे. वनविभागाच्या फलकालगतच डेब्रिजचे ढिगारे उभे राहिले आहेत. या डेब्रिंज माफियांकडे पोलिस व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. डेब्रिज टाकून खाडीचा मोठ्या प्रमाणावर भाग बुजविण्यात आला आहे. याच रोडवर सारसोळेच्या मासेमारी करणार्या आगरी-कोळी ग्रामस्थांनी खाडीत पकडलेली आपली मच्छि सुकविण्यासाठी नर्सरी ते स्मशानभूमीलगतच्या अर्ध्या रस्त्यावर सकाळपासून ते दुपारपर्यत अतिक्रमण केलेले असते.
नेरूळ सेक्टर चारमध्ये सिडको वसाहतीमध्ये महापालिका प्रशासनाकडून उद्यान व क्रिडांगणाची निर्मिती केलेली आहे. हे उद्यान दिवसा प्रेमी युगुलांचा तर रात्रीच्या वेळी गर्दुल्यांचा अड्डा बनल्याचे दिसून येते. सकाळी ८ वाजल्यापासून सांयकाळी ८ वाजेपर्यत या ठिकाणी प्रेमी युगुल बसलेली असतात. या प्रेमी युगुलांना जवळून पाहण्यासाठी आंबटशौकीनाचीही येथे गर्दी असते. पे्रमी युगुलांमुळे या ठिकाणी उद्यानात फिरावयास येणार्या खाली माना घालून फिरावे लागत असल्याचे रहीवाशांकडून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी दुपारी १२ ते ५ या वेळेत एमएसईडीसीच्या विद्युत डीपी लगत युवक नशापाणी तसेच चरस, गांजाची तलफ भागविताना पहावयास मिळतात. उद्यानाच्या सभोवताली असलेल्या संरक्षक जाळीमधील ठिकठिकाणच्या लोखंडी सळ्या गायब झाल्या असून उद्यानात कोठूनही ये-जा करण्यासाठी त्या तोडण्यात आल्याचे दिसून येते. रात्री ८ नंतर मध्यरात्री उशिरापर्यत या उद्यानात गर्दुले मोठ्या संख्येने आपली तलफ भागविण्यासाठी बसलेले असतात.
उद्यानाच्या समोरच महापालिकेचे क्रिडांगण असून क्रिडांगणाला कोणत्याही प्रकारचा नामफलक नाही. क्रिडांगणातील लोखंडी प्रवेशद्वारही तुटलेले आहे. क्रिडांगणात स्थानिक भागातील एका राजकीय नेत्याकडून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असतो. नवरात्र संपून दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी नवरात्र उत्सवाच्या सजावटीसाठी लागलेले साहीत्य प्रवेशद्वारालगतच टाकून देण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. क्रिडांगणातील ६० टक्के भागावर जंगली गवत वाढले असून काही ठिकाणी मातीचे ढिगारे पहावयास मिळत आहे. पावसाळा संपून दीड महिना उलटला तरी क्रिडांगणावरील सुकलेले जंगली गवत काढून टाकण्यास महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. जवळच असलेला खाडीकिनारा, क्रिडांगणात कमरेइतके असणारे जंगली गवत यामुळे सभोवतालच्या रहीवाशांना आपल्या सोसायटीत नाग, साप, अजगर यांचे दर्शन अधून मधून होतच असते. शेजारच्या सोसायट्यांमध्ये पहिल्या मजल्यापर्यत कोब्रा साप आल्याचे रहीवाशांकडून सांगण्यात येत आहे.
महापालिका प्रशासन या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर गोळा करत असताना नागरी सुविधा देण्यास टाळाटाळ करत आहे. निवडणूकांशिवाय अन्य कोणताही राजकीय घटक या ठिकाणी फिरत नाही. समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा होत नसल्याने प्रशासन दरबारी येथील रहीवाशांची दखल घेतली जात नाही. नेरूळ पॉश समजला जाणारा हा परिसर समस्याच्या विळख्यात अडकला आहे. गर्दुल्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून तसेच नागरी सुविधा पुरविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून काहीही कार्यवाही होत नसल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
(साभार : दै. जनशक्ती, मुंबई आवृत्ती)