भारतातील माणसांना क्रिकेट व राजकारण हे दोन विषय नेहमीच आवडीचे राहीले आहेत. या विषयामध्ये फारसे ज्ञान नसणारी भारतीय मंडळीदेखील अनेक तास या विषयावर बोलू शकतात. त्यातल्या राजकारण हा विषय अंत्यत जिव्हाळ्याचा विषय असतो. बाराही महिने 24 तास राजकारण या विषयावर चावडीगप्पा मारणारी माणसे आपल्या सभोवताली मोठ्या संख्येने पहावयास मिळतील. सध्या सर्वाच्याच मुखीॅ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा विषय चघळला जात असून त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांवर सर्वाचेच लक्ष केंद्रीत झाले आहे. गेल्या दोन दशकापासून मुंबई महापालिकेवर शिवसेना – भाजपाची सत्ता आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता मुंबई महापालिका निवडणूकांमध्ये शिवसेना-भाजपाची युती होण्याबाबत आतापासून प्रश्नचिन्ह राहीले आहे.
भाजपा हा पक्ष फार काळ कोणाच्या अंकित राहू शकत नाही. मुळातच भाजपा हा महत्वाकांक्षी पक्ष आहे. जिथे जनाधार कमी असेल त्या ठिकाणी काही काळ पडती बाजू घ्यायची आणि जनाधार वाढल्यावर उपकारकर्त्याशी फारकत घेवून आपले वर्चस्व गाजवायचे ही भाजपाची नीती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपाचा हा खरा चेहरा महाराष्ट्रीयन जनतेला पहावयास मिळाला असला तरी देशातील जनतेला भाजपाचा हा चेहरा वारंवार पहावयास मिळालेला आहे. उत्तर प्रदेशामध्ये फारसे अस्तित्व नसताना इतरांशी तडजोडीचे राजकारण भाजपाने केलेले आहे. आज गोव्यामध्ये भाजपाचे वर्चस्व दिसत असले तरी दोन दशकापूर्वी गोव्यातील राजकारणामध्ये भाजपाला फारसे स्थान नव्हते. काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक हे दोनच पक्ष प्रामुख्याने होते. गोव्यातील राजकारणात शिरकाव करताना भाजपाने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे बोट धरून गोमंतकीय राजकारणाचे धडे गिरविण्यास सुरूवात केली आणि आज मात्र गोव्यात भाजपा सत्ताधारी असून मगोपचे अस्तित्व हा संशोधनाचा विषय बनला आहे.
आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोदी लाटेमुळे भाजपाचे 122 आमदार दिसत असले महाराष्ट्राच्या राजकारणातही एकेकाळी भाजपाला फारसा जनाधार नव्हता. बाळासाहेब ठाकरेनामक एक हिंदूत्ववादी वादळाच्या कुशीत भाजपाने राजकीय वाटचाल सुरू केली. शिवसेनेच्या छायेमध्ये वावरताना भाजपाने आपली विस्तारवादी भूमिका कायम ठेवली. बाळासाहेब वैकुंठवासी झाल्यावर आणि मोदी लाटेचा उदय झाल्यावर भाजपाला शिवसेनेची गरज राहीलीच नाही. भाजपाला सर्वत्र स्वबळावर आपले कमळ फुलवायचे आहे. राजकारणात महत्वाकांक्षा बाळगणे आणि जनाधार वाढवून सत्ता संपादन करणे यात गैर काहीच नाही. ‘परंतु अडखळत असताना उभे राहण्यासाठी आपले ज्याचे बोट धरले, त्यालाच पुढे आपणास चालता येवू लागल्यावर जमिनीत गाडणे कदापि योग्य नाही’. यामुळे राजकारणातील त्या पक्षाप्रती व त्या पक्षाच्या नेतेमंडळींविषयीची विश्वसनीयता संपुष्ठात येते. त्यामुळेच राष्ट्रीय राजकारणात भाजपा पक्षाबाबत फारशी विश्वसनीयता राहीलेली नाही. मोदी लाटेमुळे भाजपाला सध्या सुगीचे दिवस आले असले तरी राजकारणात नेहमी भरती-ओहोटी ही येतच असते. भारतीय राजकारणाची रणरागिनी म्हणून जगभरात ओळखल्या जाणार्या इंदिरा गांधींनाही भारतीय मतदारांनी याचे प्रात्यक्षिक दिलेच होते.
मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा गेल्या अनेक वर्षापासून डोळा असून या महापालिकेत भाजपाचा महापौर बसविण्याची त्यांची महत्वाकांक्षा लपून राहीलेली नाही. शिवसेनेपुढे यापूर्वी फारसे न चालल्याने त्यांच्या महत्वाकांक्षा फलद्रूप होवू शकली नाही. पण पूर्वीची परिस्थिती व आताची परिस्थिती यात जमिन आसमानचा फरक आहे. भाजपाने या निवडणूकीकरता कोणत्याही परिस्थितीत कमळाचाच महापौर विराजमान करण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून कंबर कसली आहे. आशिष शेलार व किरीट सोमैय्यासारखी मंडळी उघडपणे शिवसेनेला अंगावर घेवू लागली आहेत. गेल्या काही महिन्यापासून महापालिका कारभारावर शिंतोडे उडवित गोबेल्सच्या धर्तीवर महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजु लागला आहे. हा एका नियोजित रणनीतीचाच एक भाग आहे. विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला जागावाटप चर्चेच्या गुर्हाळात अडकवून ठराविक छोट्या पक्षांना जोडीला घेत शिवसेनेला डावलून भाजपाने निवडणूक लढविली होती.
महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनसे सुप्रिमो राज ठाकरे व भाजपाशी वाढती जवळीक हीदेखील मनसे व भाजपाकडून शिवसेनेला शह देण्याचीच नियोजित राजकीय खेळीचाच तो एक भाग आहे. शिवसेनेशी युती न करता महापालिकेत सत्ता मिळविण्याकरता भाजपाची गेल्या अनेक महिन्यापासून रणनीती सुरु आहे. मनसेला सोबत घेवून मराठी मतांची जुळवणी करून मोदींना प्रचाराला आणून परप्रातियांची मते वळवून भाजपाचा महापौर विराजमान करण्याचा हा खटाटोप आहे. अर्थात विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या खेळीला जवळून अनुभवलेल्या शिवसेनेलाही एव्हाना हे ठाऊक झालेच असणार. उध्दव ठाकरे हे शांत, संयमी व वैचारिक नेतृत्व आहे. कोणताही निर्णय हे आततायीपणाने घेत नाहीत. शिवसेनाप्रमुखांचेच हे पुत्र असल्याने कोणालाही अंगावर घेण्यास ते मागेपुढे पाहत नाही. ठाकरी भाषेचा वारसाच लाभला असल्याने व मुंबई महापालिका शिवसेनेकरता प्रतिष्ठेची असल्याची प्रचारात हे आक्रमकता दाखविणार हे जगजाहिर आहे.
मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असणे ही शिवसेना-भाजपासह काँग्रेसचीही महत्वाकांक्षा असणार. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा, मनसे या पक्षांची राजकीय ताकद नगण्य असल्याने ते फक्त अस्तित्वासाठीच संघर्ष करताना पहावयास मिळतील. या निवडणूकीत उत्तर भारतीय मतदार सपा,बसपा व काँग्रेस पेक्षा भाजपालाच अधिक जवळ करण्याची शक्यता आहे. या निवडणूकीत मुस्लिम मतदारांची भूमिकाही तितकीच निर्णायक ठरणार आहे. एमआयएम हा पक्ष मनपा निवडणूकीत आक्रमकपणे उतरणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. एमआयएमचा आमदारही भायखळा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचले आहेत. मुस्लिमबहूल मतदारसंघांची लोकसंख्या मुंबई महापालिकेत मोठ्या संख्येने आहेत. काही आरपीआय नेत्यांच्या एमआयएमसोबत मुंबईत व नवी दिल्लीत बैठका सुरू आहेत. आरपीआयच्या माजी खासदारांनी दिल्लीत एमआयएम नेत्यांच्या घरी पायधूळही झाडली आहे. त्यामुळे मुस्लिम मतांना मागासवर्गीय मतांची साथ लाभल्यास एमआयएम विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाल्यास फारसे आश्चर्य वाटणार नाही. लढाई निश्चित आहे. बिगुलही वाजले आहे. सेनापतींनीही तलवारीला धार लावून ठेवली आहे. यंदा प्रथमच कधी नव्हे तो आक्रमक प्रचार होणार आहे. पण निर्णय मात्र मुंबईकर मतदारांवरच अवलंबून असणार आहे.
– संदीप खांडगेपाटील
8082097775
(साभार : दै. जनशक्ती, मुंबई आवृत्ती)
(संदीप खांडगेपाटील यांचा प्रकाशित झालेला लेख नवी मुंबई लाइव्ह.कॉमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा सादर करत आहोत. संदीप खांडगेपाटील महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ पत्रकार असून १९९२ सालापासून ते पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. कॉलेज वार्ताहर ते संपादक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या ते दै. जनशक्तीच्या मुंबई आवृत्तीमध्ये वृत्तसंपादक म्हणून काम करत आहेत.
– श्रीकांत पिंगळे : कार्यकारी संपादक : नवी मुंबई लाइव्ह.कॉम)