भिवंडीतील २५ हजार नागरिकांची कचरा डम्पिंगच्या प्रदुषणातून होणार सुटका
ठाणे / अनंतकुमार गवई
सध्या मुंबई शहर व उपनगर तसेच सभोवतलाच्या शहरामध्येही डम्पिंग ग्राऊंडची समस्या गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. गोवंडीतील देवनार डम्ंिपंग प्रकरण तर जगभरात गाजले असून मुंबईतील कचरा तळोजा तसेच कामोठेवासियांनी नकार दिला आहे. नवी मुंबईतही तुर्भे डम्पिंगचा विषय ऐरणीवर आला असून संबंधित परिसरातील नगरसेवकांनी सुरेश कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाचेही दरवाजे ठोठावण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतील मुलुंड येथे जमा होणार्या कचर्यामुळे ऐरोलीवासियांच्या जिविताला धोका निर्माण झालेला आहे. त्या पार्श्वभूमी भिवंडीतील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश खुद्द महापालिका आयुक्तांनीच दिल्यामुळे तेथील २५ हजार लोकांच्या जिवितावरचे संकट तुर्तास टळले आहे.
शहरातील कचरा डम्पिंग ग्राऊंडची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंता पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ.योगेश म्हसे यांची भेट घेतली असता चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राऊंड एक महिन्यात बंद करून दापोडा येथे सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.आयुक्त डॉ. म्हसे यांनी रहिवासी , शाळकरी मुले यांना होणार्या रोजच्या प्रदुषणाची गंभीर दखल घेवून डम्पिंग बंदचा निर्णय घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा तब्बल ३७० टन कचरा सन २०११ पासून चाविंद्रा ,गायत्रीनगर ,रामनगर या परिसरात पालिकेच्या आरक्षण क्रमांक ११५ अन्वये सिटीपार्कसाठी आरक्षित असलेल्या सर्व्हे नंबर १०६ मधील १५ एकर जागेवर टाकला जात आहे.साईबाबा व दापोडा येथील महापालिकेच्या मालकीच्या जागेवर कचरा डम्पिंगसाठी विरोध झाल्याने पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत चाविंद्रा येथे कचरा टाकण्याचे ठरले होते.येथे कचरा टाकताना योग्य ती रासायनिक औषध फवारणी , जंतुनाशक पावडर व मातीचा थर टाकण्याचे पालिका अधिकार्यांनी आश्वासित केले होते.मात्र आरोग्य विभागाचे भ्र्ष्ट अधिकारी कचरा डम्पिंगच्या व्यवस्थेचा खर्च फक्त कागदावर दाखवून स्वतःच्या खिशात घालीत आहेत त्यामुळे येथील कचर्याच्या दुर्गंधीमुळे चाविंद्रा ,पोगांव,नागांव ,गायत्रीनगर ,फातमानगर येथील २५ नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.त्यातच येथील टाकण्यात येणारा कचरा ठेकेदार पेटवून देत असल्याने प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. रात्रीच्यावेळी या परिसरात धुरकोंडी होत असल्याने नागरिकांना श्वासोच्छवास घेणेही कठीण झाले आहे.विषारी धुरामुळे रहिवाश्याना घशाचे ,दम्याचे विकार जडले असून श्वसनास त्रास होत आहे.तर या डम्पिंगच्या कचर्यातून निचरा होणार-या घाण पाण्यामुळे पोगांव,चाविंद्रा परिसरातील शेतकर्यांनी गेल्या चार वर्षांपासुन शेती लावण्याचे सोडून दिले आहे.डम्पिंगचे प्रदुषण अधिक वाढू लागल्याने समाजसेवक अनंता पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन वेळा आंदोलनही छेडले होते. या दरम्यान आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेवून स्वतः पाहणी केली होती. आयुक्तांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात माजी सरपंच मोतीराम पाटील , गोपाळ पाटील , विश्वनाथ पाटील , विजय धुळे,यांनी डम्पिंग ग्राऊंडची व्यथा मांडली असता आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेवून एक महिन्यात कचरा डम्पिंग दापोडा येथे हलवण्याचे आश्वासन दिले आहे.नागरिकांच्या आरोग्याप्रती आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचे समाजसेवक अनंता पाटील यांनी स्वागत केले आहे.