* तुर्भे डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येने गुरूवारची महासभा झाली तहकूब
* डम्पिंग ग्राऊंडच्या समस्येमुळे स्थानिकांच्या जिवितावर मृत्यूची टांगती तलवार
* स्थानिक भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुरेश कुलकर्णीच्या आक्रमकतेने प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण
* कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राऊंडचीही समस्या देविदास हांडेपाटलांच्या आक्रमक आंदोलनामुळे व पाठपुराव्यामुळे लागली होती मार्गी
नवी मुंबई ः तुर्भे येथील क्षेपणभूमीचा (डम्पिंगग्राऊंड) प्रश्न आता पेटला असून येथील क्षेपणभूमी तत्काळ हटवण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमक झाल्याने तत्काळ महसूल मंत्र्यांची भेट घेण्यासाठी महापौरांनी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सभा तहकूब केली. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील १७ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात उपलब्ध नसल्याने शुक्रवारी, दि. आज १८ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतच त्यांची सर्वपक्षीय नगरसेवकांचे शिष्टमंडळ भेट घेऊन क्षेपणभूमीचा सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी सभागृहात सांगितले.
नवी मुंबई शहरातील दैनंदिन कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘सिडको’ने आधीपासून कोपरखैरणे येथे क्षेपणभूमी तयार केली होती. सदर क्षेपणभूमीची क्षमता संपल्यानंतर त्याठिकाणी महापालिकेने निसर्ग उद्यान तयार केले आहे. कोपरखैरणे येथील क्षेपणभूमी बंद केल्यानंतर महापालिकेने तुर्भे स्टोअर येथे एमआयडीसी क्षेत्रात नव्याने शास्त्रोक्त पद्धतीने क्षेपणभूमी सुरू केली. नवी मुंबई शहरातील दैनंदिन साफसफाईतून निघणारा आणि नागरिकांच्या घरातून निघणार्या ४०० टन कचर्याची विल्हेवाट तुर्भे येथील क्षेपणभूमीवर लावली जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर श्वासाचे त्रास, दमा, आदि आजारांची लागण झाली आहे. तसेच अनेक समस्यांना देखील तोंड द्यावे लागत आहे.
नवी मुंबई महापालिकेची क्षेपणभूमी नागरीवस्तीलगत आहे. त्यामुळे तुर्भे स्टोअर्स परिसरातील दोन लाख गोरगरीब नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुर्भे येथील क्षेपणभूमी लगतच मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. तसेच महापालिकेचे रूग्णालय आणि शाळा देखील आहे. त्यामुळे त्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर नागरिकांना होत आहे. तसेच तुर्भे परिसरातील खैरणे, पावणे, सिडको वसाहत येथील नागरिकांना देखील प्रदुषणाचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार तुर्भे येथील क्षेपणभूमी अन्यत्र हलवावी म्हणून स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी अनेक वर्षापासून मागणी केली आहे. त्यांच्या सदर मागणीला सर्वपक्षीयांनी देखील पाठिंबा दिला आहे. अनेक वेळा येथील नागरिकांनी नवी मुंबई महापालिका विरोधात आंदोलन देखील केले आहे. तसेच ठाणे-बेलापूर रस्त्यावर रोको आंदोलन आंदोलनही करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने अनेक वेळा येथील तुर्भे क्षेपणभूमी हटविण्याबाबत आश्वासन देखील देण्यात आले होते. गेल्या महिन्यात तुर्भे येथील नागरिकांना प्रशासनाने येत्या एक महिन्यात तुर्भेतील क्षेपणभूमी हलविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेला सुरूवात झाल्यानंतर नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी तुर्भे येथील क्षेपणभूमी हटविण्याबाबत काय निर्णय झाला? अशी विचारणा करीत जोपर्यंत क्षेपणभूमी सदर ठिकाणाहून हटविण्यात येत नाही तोपर्यंत तेथील नागरिक आंदोलन करीतच राहणार आहेत. त्यामुळे क्षेपणभूमी कधी हटविणार ते आधी सांगावे, त्यानंतरच सभेचे कामकाज सुरू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली.
सुरेश कुलकर्णी यांनी केलेली मागणी गंभीर आहे. आपणही सदर ठिकाणी भेट देवून नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. प्रशासनाने काय निर्णय घेतला आहे याची माहिती सभागृहाला प्रशासनाने द्यावी, असे आदेश महापौर सुधाकर सोनवणे यांनी दिले. यावेळी मंत्रालयात संबंधित मंत्र्यांकडे स्वाक्षरीसाठी फाईल असल्याचे प्रशासनाकडून सांगताच संतप्त झालेल्या सदस्यांनी सभा तहकूब करण्याची मागणी करीत मंत्रालयात संबंधित मंत्र्यांची भेट घेण्याची विनंती महापौरांना केली. त्यानुसार सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा निर्णय महापौर सुधाकर सोनवणे यांनी जाहिर केला.
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बाहेर असल्याकारणाने सर्वपक्षीय नगरसेवकांचे शिष्टमंडळ मंत्रालयात जावू शकले नाही. परंतु, महसूलमंत्री आज १८ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत येत असल्याने त्यांच्याकडे डम्पिंग ग्राऊंड हलविण्यासंदर्भातील मागणी करण्यात येईल, असे महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितले. तसेच महापालिकेच्या क्षेपणभूमीला जागेची कमतरता भासत असल्याने आणखी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणीही महसूल मंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.