नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी तुकाराम मुंढेच गैरहजर
नवी मुंबई : 29 मे पासून महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेल्या “वॉक विथ कमिशनर” या अभिनव उपक्रमाला या पूर्वीच्या 19 ठिकाणी नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून आज सेक्टर 1ए, सी.बी.डी. बेलापूर येथील केशव बळीराम हेडगेवार उद्यान अर्थात मँगो गार्डन याठिकाणी काही महत्वाच्या कारणास्तव आयुक्त उपस्थित राहू शकले नसले तरी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांनी आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून नागरिकांची निवेदने स्विकारली व त्यांच्या अडी-अडचणी, सूचना जाणून घेतल्या आणि त्याचे निराकरण करण्याचे निर्देश यावेळी उपस्थित असलेल्या संबंधित विभागप्रमुखांना दिले.
याप्रसंगी नागरिकांनी अतिक्रमण, फेरीवाले, मार्केट, रस्ते, पदपथ, दिवाबत्ती, उद्याने व त्यामधील खेळणी, कचरा, कुत्रे-उंदीर व कबुतरांचा त्रास अशा विविध विषयांवर आपली लेखी निवेदने सादर केली व तोंडी सूचना केल्या. प्रत्येकाचे म्हणणे नीट ऐकून घेत अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांनी लगेच करावयाच्या बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले व धोरणात्मक बाबींवर सकारात्मक विचार करण्यात येईल असे स्पष्ट केले.
वॉक विथ कमिशनर उपक्रमात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती नागरिकांना देण्यात येते व यादीतील अधल्या मधल्या काही नागरिकांना फोन करून आपणही याबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेत असतो असे श्री. अंकुश चव्हाण म्हणाले. मागील 20 “वॉक विथ कमिशनर” उपक्रमात 1346 निवेदने प्राप्त झाली असून त्यापैकी 1191 निवेदनांवर कार्यवाही करण्यात आली असून 155 निवदनांवरील कार्यवाही प्रगती पथावर आहे अशी माहिती त्यांनी दिली.
फेरीवालामुक्त पदपथ, प्लास्टीकमुक्त नवी मुंबई साकारण्यासाठी नागरिकांनीही आपला सहयोग द्यावा असे आवाहन करीत त्यांनी पदपथ व रस्ते नागरिकांना चालण्यासाठी मोकळे मिळावेत यादृष्टीने संपूर्ण क्षेत्रात महानगरपालिका नियोजन करीत असून याबाबतची काही कामे सुरु झाली असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा कामे हाती घेण्यात आली असून महिन्याभराच्या कालावधीतच त्यामधील अनेक कामे सुरु होतील असे ते म्हणाले.
नागरिकांना महापालिकेकडे तक्रार / सूचना करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागू नये यादृष्टीने www.nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील तक्रार निवारण प्रणाली (Grievance Redressal System) अत्याधुनिक करण्यात आली असून या या सुविधेचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत असे सांगत त्यांनी त्या तक्रारीवरील कार्यवाहीची सद्यस्थिती नागरिक जाणून घेऊ शकतात व तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर समाधान झाले नाही तर पुन्हा तक्रार दाखल करू शकतात अशी माहिती दिली.
याप्रसंगी अनेक नागरिकांनी आयुक्त आज अनुपस्थितीत असतानाही त्यांच्या “वॉक विथ कमिशनर” या उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले व नागरिकांशी थेट संवाद साधणारा हा उपक्रम शहर विकासाला चांगली गती देणारा असल्याचे मत व्यक्त केले. आजच्या निवेदनकर्त्यांमध्ये युवक, युवतींची मोठ्या संख्यने उपस्थितीही लक्षवेधी होती.