१ जानेवारी १९९२ रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली आणि मार्च १९९५ रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक होवून महापालिका सभागृह अस्तित्वात आले. या २४ वर्षाच्या कालावधीत कितीतरी पालिका आयुक्त आले आणि गेले. त्यापैकी अनेकांची नावेदेखील नवी मुंबईकरांना तर सोडा, पण पालिका सभागृहात नगरसेवक होवून गेलेल्यांनाही आठवत नसतील. पण तुकाराम मुंढे हे पर्व त्याला अपवाद ठरणार आहे. लहान मुलांपासून, घरातील गृहीणीपासून, पुरूषांपासून ते थेट ज्येष्ठ नागरिकांपर्यत सर्वांनाच तुकाराम मुंढे हे नाव परिचित झाले आहे.
राजकारण आणि क्रिकेट हे दोन विषय असे आहेत की भारतीय नागरिक या विषयातले फारसे माहिती नसतानाही कित्येक तास या विषयावर बोलू शकतो. देशाच्या कानाकोपर्यात नोटा बंदीची व चलनातील अडचणीची चर्चा सुरू आहे. नवी मुंबई शहरही त्याला अपवाद नाही. पण नवी मुंबईकरांच्या मुखी आज सर्वप्रथम तुकाराम मुंढे याच नावाची चर्चा होते आणि त्यानंतर नोटाबंदीची. तुकाराम मुंढे हे पालिका आयुक्तपदी विराजमान झाल्यापासून ते आजतागायत त्यांचा चर्चेतील व जनसामान्यांतील टीआरपी कायम आहे. राजकारणातील नेतेमंडळींची, आमदार-खासदारांची, मंत्र्यांची चर्चा झाली तर एकवेळ समजण्यासारखे आहे. पण प्रशासनातील अधिकार्यांची चर्चा होणे आणि ती चर्चा सहा महिन्यापासून अधिक काळ सतत होणे हे चित्र फार क्वचितच पहावयास मिळते. नवी मुंबईत हे चित्र प्रथमच पहावयास मिळत आहे. अर्थात ही चर्चा मुंढे यांच्या कार्यप्रणालीमुळे निर्माण झालेली आहे. नवी मुंबईकरांमध्ये मुंढे यांना एक आदराचे स्थान मिळाले असून ‘ना खाया है, ना खाऊंगा और ना किसे खाने दूँगा’ ही मुंढे यांची कार्यप्रणाली नवी मुंबईकरांना आवडलेली आहे. त्यामुळेच सर्वपक्षीय राजकारणी मुंढेच्या विरोधात असताना नवी मुंबईकरांचा तुकाराम मुंढेंनाच पाठिंबा आहे. सोशल मिडीयावर राजकारणाशी संबंधित दहा-बारा टाळकी सोडली तर इतर सर्वच घटकांमध्ये मुंढे यांची प्रतिमा चांगली आहे. सोशल मिडीयावर दहा-बारा घटक मुंढे विरोधकाची भूमिका उत्तमपणे बजावत असले तरी व्हॉट्स अप ग्रुपवर हेच ठराविक चेहरे मुंढे विरोधी सूर आळविताना पहावयास मिळत आहे.
तुकाराम मुंढे यांच्या कामाविषयी, प्रामाणिकपणाविषयी कोणासही फारसे आक्षेप नाही. पण मुंढे ताठ आहेत, हेकेखोर आहेत, मनमानी करणारे आहेत असे आरोप मुंढे यांच्या बाबतीत त्यांच्या विरोधकांकडून करण्यात येत आहेत. या आरोपांमध्ये काही अंशी तथ्य असले तरी मुंढे यांनी केलेली कामे पाहता नवी मुंबईकर उदार मनाने मुंढे यांच्यामध्ये असलेल्या अवगुणांवर पांघरून घालण्यास तयार आहेत. मुंढे यांना राजकीय क्षेत्रातून विरोध होत असला तरी मुंढे या राजकीय घटकांना जुमानत नसल्याचे वारंवार उघडकीस आलेले आहे. मुंढे यांनी भ्रष्टाचाराला मदत केली असती, कामामध्ये अडथळे आणले नसते, ठेकेदारांना कामाबाबत जाब विचारला नसता, कामाचा दर्जा व गुणवत्ता याचा आग्रह धरला नसता तर कदाचित आजचे चित्र वेगळे असते. आज विरोध करणार्या राजकारण्यांनी कदाचित मुंढे यांना उचलूनही घेतले असते. पण मुंढे यांनी ही पारंपारिक चौकट मोडीत काढली. मुंढे नावाचे वादळ काय आहे याची प्रचिती अवघ्या १५ दिवसातच नवी मुंबईकरांना आली. ओला कचरा व सुका कचरा याबाबत केवळ जनजागृतीच होत होती. उपाययोजना करण्याचे धाडस कोणी दाखविले नव्हते. नागरिकही कचरा वेगवेगळा करत नव्हते. पण मुंढे यांनी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णयच नाही घेतला तर या निर्णयाच्या अंमलबजावणीसही तात्काळ सुरूवातही केली. ज्या गृहनिर्माण सोसायट्या ओला व सुका कचरा वेगळा करत नाहीत, त्यांचा कचरा न उचलण्याचे आदेश सफाई कामगारांना दिले. सोसायटी आवारात कचर्याचे ढिग उभे राहू लागल्यावर लोकांनाही कचरा वर्गीकरणाची गरज भासली आणि आज नवी मुंबईतील घराघरामधील गृहीणी सुका व ओला कचरा वेगवेगळा करू लागली आहे.
सुनियोजित शहराला फेरीवाल्यांचा व बकालपणाचा विळखा होता. या फेरीवाल्यांची आणि त्यांच्यामागे उभे राहणार्या राजकारण्यांचा मुजोरपणा मुंढे यांनी मोडीत काढला. मार्जिनल स्पेसमध्ये अतिक्रमण करणार्या व्यावसायिकांना मुंढे यांनी धडा शिकविला. पालिकेच्या परवानग्या न घेता वर्षानुवर्षे व्यवसाय करणार्या व्यावसायिकांच्या दुकानांना टाळे ठोकण्याचे नवे पर्व मुंढे यांच्याच राजवटीत सुरू झाले. अतिक्रमणे मोडीत निघाली. पदपथांनी मोकळा श्वास घेतला. मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणे गेल्याने व फेरीवाले हटविल्याने रस्त्यावरील वाहतुक कोंडी बर्याच अंशी कमी झाली. पालिकेच्या तिजोरीतही वाढ झाली.
पूर्वीचे आयुक्त असताना जे महापालिका प्रशासन करू शकले नाही, ते मुंढे यांच्या कालावधीत महापालिका प्रशासन कामे करू लागली आहे. आयुक्तांचे काय अधिकार असतात हे मुंढे यांनी दाखवून दिले आहे. पालिका सभागृहात अविश्वास ठरावावर अनेक नगरसेवक मुंढे यांच्या कार्यप्रणालीविषयी गरळ ओकत असतानाच मुंढे शांतपणे या प्रकाराला सामोरे गेले. यावेळी मुंढे यांना सभागृहासमोर बोलण्याची संधी महापौरांनी नाकारली. मुंढे यांना सभागृहात बोलण्याची संधी मिळाली असती तर विरोधात असणार्या अनेक नगरसेवकांचे पितळ उघडे पडले असते.
आजमितीला डीवायपाटील रूग्णालयावर मुंढे यांनी केलेल्या कारवाईमुळे अनेकांना या रूग्णालयाचा कमालीचा पुळका आलेला आहे. डीवायपाटील रूग्णालयाचा अनेकांना कमालीचा पुळका आलेला आहे. पण आज एकीकडे प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्काचे साडेबारा टक्केचे भुखंड मिळविण्याकरता सिडको दरबारी हेलपाटे मारावे लागत असतानाच सिडकोने डीवायपाटील रूग्णालयाला कवडीमोल भावाने जमिनीची विक्री केलेली आहे, हेदेखील पाहावे लागेल. बाजारभावाने डीवायपाटील समूहाने ही जागा खरेदी करून त्यांनी स्वस्तात गोरगरीबांवर उपचार केले असते तर डीवायपाटील समूहाचा कृतार्थपणा समजला असता. रूग्णांवरील उपचाराची बोंब सुरू असताना या समूहाने सुरु असलेल्या बांधकामाबाबत सीसी (बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र) घेतले होते का याचीही खातरजमा पुळका आलेल्या घटकांनी करून घ्यावी. आयुक्त मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाबाबत कोणकोणत्या शिक्षण सम्राटांनी आणि आरोग्य सम्राटांनी कमालीचे स्वारस्य दाखवित ठाणे ते बांद्रा धावपळ केली होती, हेदेखील नवी मुंबईकरांना चांगलेच परिचयाचे आहे. नवी मुंबईतील शिक्षणसम्राट म्हणजे कोणा दानशूर कर्णाचा अवतार नाही. अत्यल्प दरात सिडकोकडून शैक्षणिक नावखाली भुखंड लाटायचे व त्यानंतर पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन दाखवित आपले उखळ पांढरे करून घ्यायचे हा येथील शिक्षणसम्राटांचा गोरखधंदा नवी मुंबईकरांनी जवळून पाहिला आहे आणि अनुभवलाही आहे., खोटे वाटत असेल तर शिक्षणक्षेत्रातील ऍडमिशन प्रक्रियेत समाजसेवा करणार्या राजकीय घटकांकडून तसेच विद्यार्थी क्षेत्रातील संघटनांच्या पदाधिकार्यांकडूनच शहनिशा करून घ्यावी.
मुंढे कोणतेही चुकीचे काम करत नाही. सर्वपक्षीय राजकारण्यांना अंगावर घेण्यासाठी धमक असावी लागते. ते काम कोणा सोम्या गोम्याला जमणार नाही. वाघिणीचे दूध नसानसात भिनलेल्या लढवय्यालाच जमते. मुंढे यांनी ते करून दाखविले आहे. मुंढेंची जनसामान्यांमध्ये प्रतिमा स्वच्छ आहे. भ्रष्टाचार करत नाही आणि कोणाला करून देत नाही. ‘वॉक विथ कमिशनर’च्या माध्यमातून सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. काम करणार्याची चर्चा तर होणारच. मुंढे हट्टी असतील, ताठ असतील, हेकेखोर असतील, तरीही ते आम्हाला चालतील असा सूर नवी मुंबईकरांकडून आळविला जात आहे. चांगले काम करणार्याला अडथळे हे येतातच. मुंढेंना नवी मुंबईकरांचाही पाठिंबा असल्याने राजकारण्यांचा मात्र कमालीचा जळफळाट वाढीस लागला आहे.
– संदीप खांडगेपाटील
८०८२०९७७७५
साभार : दै. जनशक्ती, मुंबई आवृत्ती
(संदीप खांडगेपाटील हे ज्येष्ठ पत्रकार असून १९९२ पासून ते पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. कॉलेज वार्ताहर, मंत्रालय प्रतिनिधी, महापालिका प्रतिनिधी, उपसंपादक, कार्यकारी संपादक, संपादक अशा विविध पदावर त्यांनी या २५ वर्षात काम केेले असून ते सध्या दै. जनशक्तीच्या मुंबई आवृत्तीमध्ये वृत्तसंपादक या पदावर काम करत आहेत. त्यांचा रविवार, दि.२० नोव्हेंबर २०१६च्या दै. जनशक्तीच्या अंकात प्रकाशित झालेला लेख आम्ही जसाच्या तसा नवी मुंबई लाइव्हच्या वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.
श्रीकांत पिंगळे – कार्यकारी संपादक, नवी मुंबई लाईव्ह.कॉम)