ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतरीत झालेले नवी मुंबई शहर. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील हे एकमेव उदाहरण आहे की थेट ग्रामपंचायतीतून महापालिकेत रूपांतर व्हावे. नवी मुंबई शहराचा विकास हा सिडकोच्या माध्यमातून झालेला आहे. नवी मुंबई हे नियोजित शहर असा या शहराचा नावलौकीक आता खर्या अर्थाने इतिहासजमा झाला असून जागोजागी अतिक्रमणे, बकालपणा, नागरी समस्यांचा उद्रेक पहावास मिळतो. झोपडपट्ट्या आहेत, पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे, रस्त्यावर गॅरेजवाले आहेत, भिक्षेकरी पावलापावलावर आहेत, उद्यानात बिनधास्तपणे गर्दुले नशापाणी करताना पहावयास मिळतात आणि विशेष म्हणजे या शहराला संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यामध्ये दोन वेळा प्रथम क्रमाकांचे पारितोषिकही मिळालेले आहे. या महापालिकेकडे आज स्वमालकीचे मोरबे धरण आहे. मुंबई महापालिकेपाठोपाठ स्वमालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महापालिका आहे.मुंबई महापालिकेकडे स्वमालकीचे धरणे असली तरी ती ब्रिटीशकालीन आहेत. नवी मुंबई महापालिकेने अलिकडच्याच काळात मोरबे धरण विकत घेतले आहे. या मोरबे धरणावर वीजनिर्मिती करून नवी मुंबईकरांना ती वीज उपलब्ध करून देण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
नवी मुंबईकरांचे मोरबेसारखे स्वमालकीचे धरण असल्यामुळे पाण्याच्या बाबतीत नवी मुंबई सुजलाम सुफलाम आहे. सभोवतालच्या पनवेल, ठाणे, मुंबई शहर व मुंबईच्या उपनगरांना एकवेळ पाण्यासाठी टाहो फोडावा लागत असताना नवी मुंबईकरांवर अजून ती वेळ आलेली नाही. पण नवी मुंबईमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत आहे. पाणी चोरांचा शोध घेण्यास ना राजकारण्यांना स्वारस्य आहे, ना पालिका प्रशासनाला. पाणीचोरी आटोक्यात आल्यास तेच पाणी महापालिका प्रशासनाला शेजारच्या क्षेत्रातील प्रशासनाला विकणे शक्य आहे. पालिका प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार आजही नवी मुंबईत किमान 25 ते 30 टक्के पाणीचोरी होत आहे. झोपडपट्टी भागात, डोंगराळ भागात, एमआयडीसी परिसरात, स्लम एरियामध्ये, सिडको वसाहतीमध्ये तसेच गावठाणातील इमारतींमध्ये प्रामुख्याने पाणी चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. डोंगराळ भाग, झोपडपट्ट्यांमध्ये एकवेळ पालिका प्रशासनाला पाणी चोरी शोधून काढणे अवघड असेल, असे जरी एकवेळ मान्य केले तरी शहरी भागातील पाणीचोरीचा शोध घेणे महापालिका प्रशासनाला अवघड नाही आणि अशक्य तर मुळीच नाही.
नवी मुंबईमध्ये होत असलेल्या पाणीचोरीविषयी महापालिका प्रशासनातील पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी आणि अधिकार्यांना खडा न् खडा माहिती आहे. कॉलनी भागाच्या तुलनेत गावठाण भागात पाणीचोरीचे प्रमाण अधिक आहे. पालिका प्रशासनाकडून असलेल्या अधिकृत नळजोडण्यांवर विसंबून न राहता अनधिकृतरित्या नळजोडण्यांच्या माध्यमातून पाणीचोरीचे प्रकार राजरोसपणे सुरू आहे. पालिका प्रशासनाकडून पाणी चोरीला आळा घालण्यासाठी अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची मोहीम वरचेवर राबविण्यात येते. पण ही मोहीम फसवी असून नवी मुंबईकरांच्या तसेच महापालिका आयुक्तांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारी आहे. मध्यंतरीच्या काळात आयुक्तपदी मुंढे विराजमान झाल्यावरही अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची मोहीम व्यापक प्रमाणावर उघडण्यात आली. फोटो काढण्यात आले, वर्तमानपत्रातून प्रसिध्दी मिळाली. पण आज त्याच ठिकाणी जावून पाहिले तर सत्य परिस्थिती काही वेगळीच पहावयास मिळेल. अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याच्या प्रकाराचे आता त्या त्या भागातील स्थानिक रहीवाशांना काहीही वाटत नाही. पालिकेचे पथक आल्यावर ते स्थानिक रहीवाशी त्या प्रकाराकडे कानाडोळा करतात. ही बाब त्यांच्या अंगवळणीच पडलेली आहे. महापालिकेचे पथक येते व अनधिकृत नळजोडण्या खंडीत करून निघून जाते. त्या सोसायटीतील रहीवाशी प्लंबरला शोधतात व पुन्हा खंडीत नळजोडण्या जोडून घेतात. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. अनधिकृत नळजोडण्या खंडीत केल्यामुळे कोठेही पाणी मिळत नसल्याची आजतागायत
कोठेही बोंबाबोंब झालेली नाही. अनधिकृत नळजोडण्या खंडीत झाल्यावर नव्याने नळजोडण्या घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे नव्याने अर्ज येत नाही. याचाच अर्थ अनधिकृत नळजोडण्या करणार्यांना पालिका प्रशासनाची कोणतीही भीती राहीलेली नाही. गावठाणातील इमारतींमधील अनधिकृत नळजोडण्या खंडीत केल्या तरी किमान 15 ते 20 टक्के पाणीचोरीची समस्या संपुष्ठात येईल. पाणीचोरी कोठे होत आहे आणि अनधिकृत नळजोडण्या कोठे आहेत याची सर्व माहिती त्या त्या विभाग कार्यालयातील पाणीपुरवठा कर्मचार्यांना आहे. त्यांनी पाणीचोरी थांबविण्याचा निर्णय घेतला तरी अवघ्या 24 तासामध्ये नवी मुंबईत होत असलेल्या किमान 80 टक्के पाणीचोरीला आळा बसणार आहे. पण त्यासाठी मनपा कर्मचार्यांची इच्छा शक्ती हवी. या पाणीचोरीचा भुर्दंड नाहक अन्य नवी मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.
– संदीप खांडगेपाटील
8082097775
साभार : दै. जनशक्ती, मुंबई आवृत्ती
(संदीप खांडगेपाटील हे ज्येष्ठ पत्रकार असून १९९२ पासून ते पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. कॉलेज वार्ताहर, मंत्रालय प्रतिनिधी, महापालिका प्रतिनिधी, उपसंपादक, कार्यकारी संपादक, संपादक अशा विविध पदावर त्यांनी या २५ वर्षात काम केेले असून ते सध्या दै. जनशक्तीच्या मुंबई आवृत्तीमध्ये वृत्तसंपादक या पदावर काम करत आहेत. त्यांचा दि.२1 नोव्हेंबर २०१६च्या दै. जनशक्तीच्या अंकात प्रकाशित झालेला लेख आम्ही जसाच्या तसा नवी मुंबई लाइव्हच्या वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.
श्रीकांत पिंगळे – कार्यकारी संपादक, नवी मुंबई लाईव्ह.कॉम)