श्रीकांत पिंगळे
* रूग्णालयावरील कारवाई येणार महापालिका प्रशासनाच्या अंगलट
* आकसापायी कारवाई केल्याचा नगरसेवकाचा आरोप
* नवी मुंबईकरांमध्ये पालिकेप्रती संतापाची लाट
नवी मुंबई ः एकीकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा आरोग्य विभागाच्या वतीने दिली जाणारी रूग्णालयीन सेवा तकलादू असताना नेरूळ येथील डीवायपाटील रूग्णालयाकडून अत्यल्प दरामध्ये दर्जेदार रूग्णालयीन सेवा उपलब्ध करून दिली जात होती. महापालिका प्रशासनाने २८ नोव्हेंबरपर्यत डीवायपाटील रूग्णालयाला कागदपत्रे सादरीकरणाबाबत मुदत दिलेली असतानाच तब्बल १२ दिवस अगोदर केलेली कारवाई ही आकसापोटी असल्याचा आरोप नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.
कागदपत्रांची पुर्तता न केल्याच्या कारणास्तव नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या नोंदणी नुतनीकरणाचा अर्ज फेटाळून लावत सदर रुग्णालयाची नोंदणी रद्द करतानाच डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची महापालिकेची कारवाई प्रशासनाच्या चांगलीच अंगलट आली आहे. सदर कारवाई करताना महापालिका अधिकार्यांनी आततायीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दस्तुरखुद्द महापालिकेच्या आरोग्य विभागानेच डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाला कागदपत्रे सादर करण्यासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. असे असताना महापालिका प्रशासनाने या हॉस्पीटलच्या विरोधात १६ नोव्हेंबर रोजी नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हेतुपुरस्सर आणि आकसबुध्दीने महापालिका प्रशासनाने सदर कारवाई केल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.
दर तीन वर्षानंतर बॉम्बे नर्सिंग होम ऍक्टनुसार महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्सना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रजिस्ट्रेशन घ्यावे लागते. गत ३१ मार्च २०१६ रोजी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या रजिस्ट्रेशनची मुदत संपल्यानंतर व्यवस्थापनाने नोंदणी नुतनीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, सदर अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या अटी-शर्तींची तसेच कागदपत्रांची पुर्तता न केल्याने आरोग्य विभागाने डॉ. डी. वाय. रुग्णालयास नोटिस बजावून कागदपत्रांची पुर्तता त्यानंतर गत ७ ऑक्टोबर २०१६ रोजी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल व्यवस्थापनाने पुर्नंनोंदणीकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज सादर केला होता. या पत्राच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०१६ रोजी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची नोंदणी अद्ययावत प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे ना-हरकत अद्ययावत प्रमाणपत्र आणि नवी मुंबई महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. उपरोक्त आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तसेच पुर्नंनोंदणीकरीता प्रत्यक्ष भेटून बाजु मांडण्यासाठी आरोग्य विभागाने २८ नोव्हेंबर २०१६ पर्यंतची मुदत डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलला दिली होती. पण, दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर न झाल्यास पुर्ननोंदणीचा आपला अर्ज नाकारण्यात येऊन आपली नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी पत्रात नमूद केले आहे. असे असताना मुदती आधीच डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल व्यवस्थापनाविरोधात १६ नोव्हेंबर रोजी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यामागे महापालिका प्रशासनाच्या हेतूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
चौकट
डीवायपाटील रूग्णालयाकडून दिली जाणारी वैद्यकीय सेवा ही दर्जेदार स्वरूपाची व गोरगरीबांना परवडणारी होती. एकीकडे महापालिका रूग्णालयांचीच अवस्था ‘आयसीयू’मध्ये उपचार करण्यालायक अवस्थेेत असताना डीवायपाटीलसारख्या सेवाभावी रूग्णालयावर कारवाई करण्यापूर्वी मनपा प्रशासनाने तेथील उपचार करणार्या रूग्णांचा व उपचारासाठी येणार्या रूग्णांचा विचार करणे आवश्यक होते. कोठेतरी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य सुविधेला मर्यादा पडल्या असल्यानेच नवी मुंबईकरांनी डीवायपाटील रूग्णालयातील आरोग्य सुविधेवर विश्वास दाखविला आहे. कागदपत्रांसाठी महापालिका प्रशासनाने दिलेल्या मुदतीस १२ दिवसाचा कालावधी बाकी असतानाही महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई केवळ आकसापोटी व सूडबुध्दीने केली असल्याचे पहावयास मिळत आहे.
– संदीप खांडगेपाटील
ज्येष्ठ पत्रकार