गणेश इंगवले
३० नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार घोषणा ——
मुंबई : ऐतिहासिक पुरूषांच्या प्रकरणामध्ये आजवर आक्रमक भूमिका घेणार्या संभाजी ब्रिगेड संघटनेला निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली असून, ३० नोव्हेंबर रोजी मुंबई येथील रंगशारदा सभागृह बांद्रा येथे दुपारी ३ वाजता संभाजी ब्रिगेड या नवीन पक्षाची राजकीय अजेंड्या सह अधिकृत घोषणा होणार आहे. आगामी सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड लढविणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगिलते.
पुणे येथे नुकतीच कोहिनूर सभागृहात संभाजी ब्रिगेडची राजकीय मान्यते नंतर पहिलीच कार्यकारणीची बैठक प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पक्षाच्या लोल्न्चींग कार्यक्रमाची चर्चा करून नियोजन करण्यात आले. पक्षाचे लोन्चींग मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून पक्षाचा झेंडा व लोगोला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी संभाजी ब्रिगेडचे लोन्चींग गीत कंपोज केले असल्याची माहिती शिवानंद भानुसे यांनी यावेळी दिली.
संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्वच निवडणुका डोळ्या समोर ठेवून कामाला लागावे व मुंबई येथे ३० नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहावे असे आवाहन भानुसे यांनी यावेळी केले आहे.
चौकट
—- राजकारणातही १०० टक्के समाजकारण —–
बहुजन तरुणाचे सशक्त संघटन उभे करून युवकांसाठी व शेतकर्यांसाठी व विविध समस्यावर आक्रमक आंदोलन करणारी संभाजी ब्रिगेड राज्याच्या राजकारणात शिरकाव करणार आहे. गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता या अभियानामुळे संभाजी ब्रिगेडने आपले जाळे पसरविले आहे. या पुढेही राजकारणातही १०० टक्के समाजकारण करणार असल्याचे भानुसे यांनी यावेळी सांगितले.