गणेश इंगवले
* इमारतीतील फेरबदलाकडे पालिकेचा आश्रय तर झोपड्यांवर मात्र कारवाई
* ८७७२ इमारतीत अनधिकृत फेरबदलांवर कारवाई कधी होणार
* राजाश्रयामुळे मिळतय श्रीमंतांच्या बांधकामाला अभय ?
मुंबई :- महापालिकेने झोपडयांच्या टॉवरवर धडकपणे कारवाई केली मात्र उंच इमारतीतील अनधिकृतपणे वाढीव बांधकाम केलेल्या इमारतींकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत अनधिकृत वाढीव बांधकामे केलेली सुमारे आठ हजार ७७२ इमारती असल्याची माहिती हाती आली आहे. मात्र राजाश्रयामुळे त्या इमारतींना अभय मिळत आहे. त्यामुळे या इमारतींवर कधी कारवाई करणार असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
नियम धाब्यावर बसवून अनेक इमारती जादा बांधकाम करीत आहेत त्यामध्ये एफएसआयचे उल्लंघन तसेच इमारतीत विना परवाना फेरबदल, वाढीव बांधकाम आदींचा समावेश आहे. यासंदर्भात पालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. मात्र तक्रारीनंतर अशा इमारतींची पाहणी करून कारवाईसाठी यादी केली जाते. मात्र ही कागदावरच राहिली आहे. यावर ठोस कारवाई होत नसल्याने अनधिकृतपणे वाढीव बांधकामांचे प्रमाण वाढते आहे. १७ मजल्याचे बांधकाम करून त्यात वाढीव बांधकाम केल्याच्या तब्बल ८७७२ इमारती आहेत. यामध्ये १९५५ रहिवासी इमारतीत एफएसआयचे उल्लंघन, तर ३२३२ इमारतीत फेरबदल तसेच वाढीव बांधकाम केल्याच्या सुमारे ८७७२ इमारतींची प्रकरणे आहेत. २४ वॉर्डातील सर्वात जास्त भांडूपमध्ये १११३ इमारती कारवाईविना आहे. एच /वेस्टमध्ये ८२५, भायखळा परिसरात ७७८, इमारतींचा समावेश आहे. पालिका अशा इमारतींना नोटिसा पाठवते. मात्र या नोटिसांना केराची टोपली दाखवण्यात येते. इमारतीत विना परवाना बांधकाम करणार्यांना एमआरटीपी ऍक्टनुसार कारवाई केली जाते. यांमध्ये नियमभंग करणार्यांना कारावास होऊ शकतो. मात्र राजकीय दबावामुळे ही कारवाई होत नसल्याची स्थिती आहे.
पालिकेने सध्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा उगारला आहे. यामध्ये झोपड्यांवर कारवाई सुरू आहे. अधूनमधून काही इमारतीतही कारवाई केली जाते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत आदेश असूनही वॉर्ड पातळीवर ही कारवाई ठोसपणे केली जात नाही. सध्या सर्व कामांचे संगणीकरण केले जात आहे. त्यामुळे इमारतींची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कारवाई धिम्या गतीने सुरू आहे याचा अहवाल मागवून अशा सर्व इमारतीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका अधिकार्याांने दिली.